‘पवना नदीसुधार प्रकल्पास निधी मंजूर करा’; आमदार अमित गोरखे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये दरवर्षी निर्माण होणारी पूरजन्य परिस्थिती लक्षात घेता पवनानदी सुधार प्रकल्पासाठी तत्काळ निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
जिल्हा वार्षिक योजना पुणे विभागाच्या पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत गोरखे यांनी ही मागणी केली. पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यभागातील पवनानदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू होण्यासाठी निधीअभावी अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. ही बाब आमदार गोरखे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. गोरखे म्हणाले, की पावसाळ्यात पवनानदीलगतच्या परिसरात पूरजन्यस्थिती निर्माण होते. मामुर्डी, किवळे, रावेत, वाल्हेकरवाडी, चिंचवड, काळेवाडी, रहाटणी, पिंपरी, कासारवाडी, फुगेवाडी, पिंपळे गुरव, दापोडी, सांगवी या भागांमध्ये ही परिस्थिती पाहण्यास मिळते. पिंपरी, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी येथील नागरिकांना पूरजन्यस्थिती निर्माण झाल्यानंतर तात्पुरते स्थलांतर करावे लागते. त्यामुळे विशेष बाब म्हणून पवना नदीसुधार योजनेसाठी केंद्रासह राज्य शासनाकडून विशेष निधी मिळावा.
हेही वाचा – एआयच्या सहाय्याने पुणे जिल्ह्याचा आता ‘समग्र पर्यटन आराखडा’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. पवना नदीसुधार प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिल्या आहेत. त्यांनीदेखील तत्काळ सकारात्मक सहमती दर्शविली आहे. तसेच, राज्य शासन आणि पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प सुरू होईल, असे नमूद केले आहे. यावेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार दिलीप वळसे-पाटील, आमदार शंकर जगताप, सुनील शेळके, राहुल कुल, शंकर मांडेकर, चेतन तुपे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पलकुंडलवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आदी उपस्थित होते.