चऱ्होली प्रभाग ३ मध्ये अनुराधा साळुंके यांना राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी; अर्ज दाखल
भाजपविरोधी आक्रमक धोरण; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पाठिंबा

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी चऱ्होली प्रभाग क्रमांक ३ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनुराधा दीपक साळुंके यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.
महिला संघटनांचे सशक्तीकरण, प्रभागातील प्रलंबित विकासकामे, पाणीपुरवठा व नागरी सुविधांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आधारित सादर केलेल्या ठोस ‘अजेंड्या’च्या आधारे पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनुराधा साळुंके यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केली. यावेळी ते म्हणाले, “पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. कोणालाही घाबरण्याचे कारण नाही. आतापर्यंत केलेली विकासकामे नागरिकांपर्यंत पोहोचवा, मतदार नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील.”

हेही वाचा : एस. बी. पाटील ज्युनिअर कॉलेजचे ‘नवरस’ वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बोलताना अनुराधा साळुंके म्हणाल्या, “राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते अजित पवार यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, याबद्दल मी त्यांची मनःपूर्वक आभारी आहे. पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासाच्या मुद्द्यांवर काम करत राहीन. शहराची प्रगती राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातूनच झाली आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे.”
चऱ्होली प्रभागातील पाणीपुरवठा, नागरी सुविधा तसेच महिलांशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शहराच्या प्रगतीचा संकल्प पुढे नेण्यासाठी नागरिकांनी घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले आहे.
उमेदवारी जाहीर होऊन अर्ज दाखल झाल्याने चऱ्होली प्रभाग क्रमांक ३ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, निवडणूक लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




