पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला बेड्या

पिंपरी l प्रतिनिधी
विनापरवाना पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. 30) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास बोगीरवस्ती, धामणे येथे करण्यात आली.
अक्षय नाथा कोळेकर (वय 24, रा. धामणे, बोगीरवस्ती, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट तीनचे कर्मचारी योगेश्वर औदुंबर कोळेकर (वय 31) यांनी रविवारी (दि. 30) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कोळेकर याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास त्याला त्याच्या घराजवळून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पोलिसांना एक पिस्तूल मिळाले. पोलिसांनी 50 हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल हस्तगत केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.





