पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क आणि तारांगण येथे १३वे राज्यस्तरीय खगोल अभ्यासक संमेलन
सर्वसामान्य लोकांमध्ये आकाश निरीक्षणाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न
पिंपरी-चिंचवड : सर्वसामान्य लोकांमध्ये आकाश निरीक्षणाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने (sky observation) १३ वे राज्यस्तरीय खगोल अभ्यासक संमेलन मराठी खगोल अभ्यासक मंडळ, नांदेड आणि पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४-१५ डिसेंबर २०२४ दरम्यान पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क आणि तारांगण, चिंचवड, पुणे येथे आयोजित केले आहे.
या संमेलनादरम्यान चर्चेला घेतलेले महाराष्ट्रातील खगोल अभ्यासकांचा भविष्यवेत्ते चंद्रशेखर, वेध अंतरिक्षाचा….सहभाग आपला, हौशी खगोल शास्त्राचे बदलते स्वरूप, उल्कापिंड अभ्यास, उल्कापिंडांना अंतराळ मोहिमांद्वारे गवसणी, खगोलीय भू-शास्त्र, परग्रहवासीयांचा शोध, रेडिओ दुर्बीण या विषयी होणारे परिसंवाद/ व्याख्याने, आकाशाला गवसणी व आयसर पुणे कल्पकघर, तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका निर्मित नवीनच उभारण्यात आलेल्या तारांगणाची भेट आणि पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथील विविध विज्ञान सुविधांची वैज्ञानिक सहल, महाराष्ट्रातील विविध खगोल जागृती संस्थांद्वारा आयोजित कार्यक्रमांचा परिचय अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.
पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे संस्थापक-संचालक प्रवीण तुपे आणि मराठी खगोल अभ्यासक मंडळ कार्यकारिणीच्या मार्गदर्शना अंतर्गत संपन्न होणा-या या राज्यस्तरीय संमेलनाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमास अतिथी विशेष हेमंत वाटवे, चेअरमन व मॅनेजींग डायरेक्टर, विलो मॅथर अँड प्लॅट, पुणे तसेच ज्येष्ठ खगोल अभ्यासक आणि मराठी खगोल अभ्यासक मंडळाचे अध्यक्ष दा. कृ. सोमण, डॉ. निवास पाटील, श्रीनिवास औंधकर, ज्योतिर्विद्या परिसंस्थेचे अनिरुद्ध देशपांडे, हेमंत मोने, डॉ. भरत अडुर, डॉ. लीना बोकील, सायन्स पार्क संचालक सारंग ओक, मयुरेश प्रभुणे, सुधीर फाकटकर, सुरेश चोपणे, मंगेश सुतार, सोनल थोरवे, हा नेवेस्कर आदी उपस्थित राहणार आहेत.
या वेळेस तारांगण परिसरात नव्याने उभारण्यात येणा-या ‘व्यंकटेश बापुजी केतकर’ व ‘सूर्याचा व्यास मोजणे’ या आयुका, पुणे तर्फे घेण्यात आलेल्या प्रकल्पाबद्दलची माहितीपत्रके प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या संपूर्ण संमेलनाची विस्तृत कार्यक्रमपत्रिका पिंपरी चिंचवड सायन्स पार्कच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
कार्यक्रमासाठी नोंदणी आवश्यक…
तसेच कार्यक्रमासाठी येणा-या प्रतिनिधींसाठीची नाव नोंदणी शुल्क रु. ८००/- (निवास व्यवस्था वगळून) व निवास व्यवस्थेसह रु. १०००/- प्रतिव्यक्ती आहे. संमेलनात सहभागी होणा-या व्यक्तींनी आपली स्वीकृती मराठी खगोल अभ्यासक मंडळाच्या [email protected] या ई-मेलवर दि. ०८ डिसेंबर २०२४ पर्यंत कळवावी. अधिक माहितीकरीता मराठी खगोल अभ्यासक मंडळाचे सचिव श्रीनिवास औंधकर (9422171256), कोषाध्यक्ष सचिन मालेगावकर (9922212099) आणि सायन्स पार्ककडील समन्वयक श्री. सुनिल पोटे (9552994294) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.