आयआयबीएम कॉलेजच्या ‘झेस्ट’ क्रीडा महोत्सवाचा दिमाखदार प्रारंभ; कु. प्रतिक्षा डफळ यांना ‘झाशीची राणी’ पुरस्कार प्रदान
चिखली क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कौशल्याला मिळणार वाव; मान्यवरांची उपस्थिती

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
चिखली येथील आयआयबीएम (IIBM) कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट संस्थेच्या वार्षिक ‘झेस्ट’ क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी उत्साही वातावरणात संपन्न झाले. या उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या विभागप्रमुख कु. प्रतिक्षा सुभाष डफळ यांना त्यांच्या मागील वर्षातील सर्वोत्कृष्ट व कौतुकास्पद कामगिरीबद्दल प्रियदर्शनी क्रीडा प्रतिष्ठान आणि G99 स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने ‘झाशीची राणी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
मैदानावर क्रीडाज्योत अन् उत्साह
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रियदर्शनी क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण जाधव, G99 स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष गिरीश बिंजवे, ज्योती बडेकर, आर्यन मस्के, प्राचार्य प्रदीप फुलकर आणि विविध विभागप्रमुखांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मैदानावर क्रीडाज्योत फिरवून क्रीडांगणाचे पूजन केले. त्यानंतर मान्यवरांनी श्रीफळ वाढवून अधिकृतपणे सामन्यांना सुरुवात केली.
हेही वाचा : मोशी परिसरात दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
आरोग्य आणि शिस्तीचा मंत्र
प्रमुख पाहुणे किरण जाधव यांनी विद्यार्थ्यांना फिटनेस आणि व्यायामाचे महत्त्व पटवून दिले. तर गिरीश बिंजवे यांनी “अभ्यासासोबतच आरोग्याची काळजी घेणे आणि जीवनात निटनेटकेपणा राखणे यशासाठी आवश्यक आहे,” असा मोलाचा संदेश दिला.
आठवडाभर खेळांची मेजवानी
हा क्रीडा महोत्सव पुढील आठ दिवस चालणार असून यात क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, डॉचबॉल, धावणे, रस्सीखेच, कॅरम, चेस आणि इलेक्ट्रॉनिक गेम्स अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत खेळाचा आनंद लुटला.
पुरस्काराने गौरवल्याबद्दल अभिनंदन
कु. प्रतिक्षा डफळ यांना मिळालेल्या या बहुमानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, प्राचार्य प्रदीप फुलकर, विभागप्रमुख अमोल भागवत, अनिकेत वंजारी, संदीप जाधव आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. संस्थेसाठी त्या ‘झाशीची राणी’च आहेत, अशा शब्दांत त्यांचे कौतुक करण्यात आले.




