सामर्थ्यवान राहण्यास निरोगी असणं आवश्यक – आमदार लक्ष्मण जगताप

- आॅपरेशन थिएटर संकुलाचे आमदार जगतापांच्या हस्ते उद्घाटन
पिंपरी ( महा ई न्यूज ) – सामर्थ्यवान राहण्यासाठी निरोगी असणे आवश्यक आहे. निरोगी ठेवण्याचे काम डॉक्टर्स करतात. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यामातून ते काम होईल, असे मत आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील पदव्युत्तर महाविद्यालयाच्या शासकीय विभागाचे नुतनीकृत आॅफरेशन थिएटर संकुलाचे आज ( बुधवार) उद्घाटन त्यांचे हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास महापाैर राहुल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसदस्य नामदेव ढाके, नगरसदस्या सुजाता पालांडे, सुलक्षणा धर-शिलवंत, स्विकृत सदस्य माऊली थोरात, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज देशमुख, डॉ. यशवंत इंगळे आदी उपस्थित होते.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, शहरातुन व ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने रुग्ण औषध उपचारासाठी रुग्णालयात येत असतात. महानगरपालिकेने या रुग्णालयाच्या माध्यमातून राज्य सरकारचीही जबाबदारी घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपले अनुभवातुन व आपल्या ज्ञानाच्या शिदोरीतून या रुग्णाची सेवा करण्याची संधी डॉक्टरांना महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिलेली आहे. भविष्यात वैद्यकीय सेवेविषयी काही अडचणी असल्यास त्या अडचणी शासनाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, पीजी संस्था निर्माण करणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही भारतातील पहिली महानगरपालिका आहे. पोस्ट ग्रॅज्युएट असणा-या तज्ञ डॉक्टरांची रुग्णालयात आवश्यकता असून पद्व्युत्तर संस्थेकरिता नवीन इमारत उभारण्याचा प्रयत्न महानगरपालिका करीत आहे. एकूण १५ विविध विषयांवर पद्व्युत्तर संस्था काम करणार आहे. मेडिसिन्स सर्जरी, रेडिओलॉजी हे तीन विषय प्रस्तावित केलेले आहेत. भविष्यात सुपर स्पेशालिटीचे विषयही घेण्यात येतील. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी निवासासह
विविध व्यवस्था करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. प्रशिक्षित नर्सेस व कर्मचा-यांची गरज भासणार आहे. येथे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांकडून शासकीय महाविद्यालयांमध्ये घेतले जाणारे शुल्क घेण्यात येईल. सीएसआरचा वापरही करण्यात येणार आहे. दर्जेदार सेवा व दर्जेदार वैद्यकीय शिक्षण देण्यावर भर देण्यात येईल.