शिरुर लोकसभा, माजी आमदार दिलीप मोहितेंसोबत विलास लांडेच्या ‘चाय पे चर्चा’

पिंपरी ( महा ई न्यूज ) – शिरुर लोकसभा मतदार संघात खेडचे माजी आमदार विलास लांडे हे उमेदवारीसाठी इच्छुक नसले तरी पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढावी लागेल, शिवाय पक्षाने दिलेल्या उमेदवाराला विजयीही करावे लागेल, त्यादृष्टीने राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्याशी चाय पे चर्चा केली. एकमेकांमधील असलेला दुरावा दूर करुन आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टाने पक्षाच्या उमेदवारांचे एक दिलाने काम करण्याचा चंग बांधला आहे.
शिरुर लोकसभेचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्यात लढत झाली तर यावेळी लांडे निवडून येतील, असा विश्वास लांडे व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना आहे. खेडमध्ये मताधिक्य मिळविण्यासाठी मोहिते यांच्याशी जुळवून घेणे महत्त्वाचे आहे. लांडे यांचा खेड तालुक्यात नातलग तसेच समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा गोतावळा आहे. लांडे हे राजकारणात असले तरी ते एक उद्योजक आहेत. त्यांची कंपनी चाकण येथे आहे. त्यामुळे त्यांचा संबंध तरुणवर्ग, कामगारांशी आहे.
खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट असले तरी दोन्ही गटांशी लांडे यांचे सख्य आहे. त्यामुळे दोन्ही गट निवडणुकीत काम करतील, असा लांडे यांना विश्वास आहे. या वेळी राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होईल, असा राष्ट्रवादीला तसेच लांडे व त्यांच्या समर्थकांना विश्वास आहे. लांडे यांनी खासदार आढळराव पाटील यांच्या विरोधात २००९ मध्ये निवडणूक लढविली होती. त्या वेळी लांडे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला होता.