महापालिकेच्या रस्त्यांची कामे निष्कृष्ट; दोन महिन्यात अनेक रस्त्यांची होतेय चाळण

- पिंपरी चाैक ते वल्लभनगर रस्ता पालिकेच्या कामांचा अप्रतिम नमुना
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरात अनेक रस्त्यांची चाळण होवू लागली आहे. शहरात खासगी कंपन्यांनी केलेली खोदाई, प्रभागात चोवीस तास पाण्याच्या पाईपलाईन, ड्रेनेज लाईन, गल्लोगल्ली रस्त्यांचे डांबरीकरण यासह अन्य पावसाळापुर्वी कामे केलेली आहेत. तसेच अनेक ठिकाणी नवीन केलेल्या रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने मे व जून महिन्यात अनेक रस्त्याचे डांबरीकरण ठेकेदाराकडून करण्यात आले़. पहिल्याच पावसात दोन महिन्यांपूर्वी तयार केलेल्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे़. त्यामुळे वाहनचालक, पादचारी, सायकलस्वार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे़.
शहरातील रस्त्याची दोनच महिन्यात बिकट अवस्था झालेली आहे़. त्यामुळे नागरिकांना रस्त्याने प्रवास करणे अवघड होत आहे़. तसेच काही पादचारी मार्गावर अतिक्रमण केले आहे. रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना, वृद्धांना, शालेय विद्यार्थ्यांना रहदारीस अडथळा होत आहे. त्यातच रस्त्यात खड्डे पडल्याने तसेच ठिकठिकाणी पाणी साचते. वाहनांमुळे रस्त्यातील पाणी अंगावर येत असल्याने पादचाऱ्यांचे हाल होत आहेत़. खड्डे, पाण्याचे डबके चुकवताना अपघात होत आहेत़. लहान मुले घसरून पडत आहेत़.
महापालिका ठेकेदाराने पावसाळापूर्व या रस्त्याचे काम केले़. परंतु, रस्ता व्यवस्थित न केल्याने पाण्याचा निचरा होत नाही़. त्यामुळे जागोजागी छोटी छोटी तळी साचत आहेत़. त्यामुळे दुचाकीचालकांना व पादचा-यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे़. रस्त्याचे डांबरीकरण करून दोन महिने पूर्ण होत नाहीत तोवरच सर्व रस्त्यात खड्डे पडले आहेत़ संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याची पुन्हा दुरुस्ती करून घ्यावी, महापालिकेच्या संबंधित विभागाने याची चौकशी करून ठेकेदाराला दंड करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे़.