पुनःश्च हरी ॐ म्हणता व ‘हरी’लाच कोंडून ठेवता; मनसेचा ठाकरे सरकारवर निशाना

मुंबई- कोरोना पसरणार नाही याची खबरदारी घेत राज्य सरकार विविध गोष्टी सुरु करण्याचा निर्णय घेत आहे. मात्र, राज्यातील मंदिरे खुली करण्याबाबत राज्य सरकारने ठोस निर्णय घेतलेला नाही. मंदिरे खुली करण्यावरून राज्यातील राजकारण देखील तापले आहे. अशातच मनसेने देखील मंदिरे खुली करण्यावरून ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे.
याबाबत मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी भाष्य केले आहे. ‘पुनःश्च हरी ॐ म्हणता व “हरी” ला च कोंडून ठेवता. बार उघडले, बारची वेळ देखील वाढवून दिली. आता जलतरण तलाव , मल्टिप्लेक्सला परवानगी, मग कोरोना फक्त मंदिरातच होईल का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पुढे नांदगावकर म्हणतात, ‘काय तर्क असावा या मागे हे कोडेच आहे. हा केवळ भावनेचा नाही तर तेथील संबधित हजारो व्यावसायिकांच्या उपजीविकेचा व रोजगाराचा देखील प्रश्न असल्याचे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
तर दुसरीकडे याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीनं तुळजापूर आणि पंढरपूर येथे मंदिरं उघडण्यासाठीच्या मागणीवरून आंदोलन करण्याचा इशारा दिला. यामुळे आता मंदिरे खुली करण्याबाबत राजकारण चांगलेच पेटलेले पाहायला मिळत आहे.