पालिकेच्या समन्वयाने कोरोना सदृश्य परिस्थितीत वंचितांना मिळणार ‘शिधा’, स्वयंसेवकांनी घेतला पुढाकार

पिंपरी |महाईन्यूज | प्रतिनिधी
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर विविध आदेश आणि सूचना देण्यात येत आहेत. कोरोनामुळे देशपातळीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. या परिस्थितीत हातावर पोट असणा-यांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी काही स्वयंसेवी संस्था आणि व्यक्ती पुढे सरसावल्या आहेत. या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील गरजू व्यक्तींना अन्न आणि शिधा देण्यात येणार आहे. यासाठी महापालिका समन्वयक म्हणून काम करणार आहे अशी माहिती महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात आज महापौर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक संपन्न झाली. या बैठकीस उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, नगरसदस्य विलास मडीगेरी, अभिषेक बारणे, शशिकांत कदम, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, प्रशांत जोशी, संदिप खोत, सीताराम बहुरे, आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, सुनिल अलमलेकर, कार्यकारी अभियंता डॉ. ज्ञानेश्वर मुंधारे, श्रीकांत सवणे, देवण्णा गटुंवार, प्रदिप पुजारी, प्रशांत पाटील, संजय घुबे, नगरसचिव उल्हास जगताप, आपत्ती व्यवस्थापन समन्वयक ओमप्रकाश बहिवाल, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, इस्कॉनचे प्रतिनिधी सीतापती दास, पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अभिमान भोसले, अविनाश ढमाले यांच्यासह महापालिकेचे क्रीडा पर्यवेक्षक आणि शिक्षक उपस्थित होते.
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही नागरिकांवर उपजिवीकेचा प्रश्न उद्भवला असल्याने त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. यामध्ये वृध्द, दिव्यांग, अनाथ, निराधार, बेवारस यांच्यासह काही विद्यार्थी, कामगार, रोजंदारीवर काम करणारे व्यक्ती आदींचा समावेश आहे. या सर्वांना सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत अन्न आणि शिधा पुरविण्यासंदर्भात विविध स्वयंसेवी संस्था आणि व्यक्ती पुढे सरसावल्या आहेत. अन्न आणि शिधा याची गरज असणा-या व्यक्तींचा शोध घेवून त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविण्यासाठी महापालिकेने समन्वय कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाचे प्रमुख म्हणून सहाय्यक आयुक्त संदिप खोत काम पाहत आहेत. भोसरी येथील इंद्रायणीनगर मधील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातून या कक्षाचे काम चालणार आहे.
अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाजाचे नियोजन सुरु आहे. गरजूंना घरपोच मदत देण्यासाठी त्या त्या भागातील नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, संस्था यांचे सहकार्य घेण्यात येईल. यासाठी प्रभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमण्यात आले आहे. या पथकाला बांधकाम परवानगी व अतिक्रमण निर्मुलन पथक आणि पोलिस यंत्रणेचे सहकार्य असणार आहे. जेव्हा रोजगार मिळतो त्यानंतरच घरची चूल पेटते अशा व्यक्तींवर उपासमारीची वेळ आली आहे, त्यांना माणूसकीच्या नात्याने आपली नैतिक जबाबदारी म्हणून निस्वार्थ भावनेने मदत करणे गरजेचे आहे असे महापौर ढोरे म्हणाल्या.
यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्था आणि व्यक्ती पुढे आल्या ही दिलासादायक बाब आहे. सांघिक भावनेने केलेले कोणतेही काम यशस्वी होत असते. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी शासन आणि महापालिकेने केलेल्या आदेश आणि सूचनांचे पालन करावे असे आवाहन महापौर ढोरे यांनी केले. यावेळी पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्य विलास मडिगेरी, अभिषेक बारणे, शशिकांत कदम यांनीही सूचना केल्या. अधिक माहितीसाठी महापालिकेच्या सारथी क्रमांक ८८८८००६६६६ यावर संपर्क साधण्याचे आवाहन पक्षनेते ढाके यांनी केले आहे.