पालिकेच्या माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद

पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 18 माध्यमिक शाळांमध्ये एकूण 32.50 टक्के विद्यार्थ्यांनी संमत्तीपत्रासह उपस्थिती लावली. एकूण विद्यार्थी संख्येपैकी 50 टक्केच विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यात आले होते. त्यानुसार 1 हजार 335 विद्यार्थ्यांनी आज पहिल्या दिवशी हजेरी लावली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकूण 18 शाळा आहेत. सर्व शाळांची एकूण 5 हजार 3 विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. त्यामध्ये 2 हजार 397 मुले तर 2 हजार 606 मुलींची संख्या आहे. त्यापैकी 50 टक्के म्हणजेच 2 हजार 502 विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी पालकांच्या संमतीपत्रासह हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार एकूण 1 हजार 335 विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. म्हणजे 50 टक्के पैकी 32.50 टक्के विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहून हजेरी लावली.

त्यामध्ये केशवनगर, संत तुकारामनगर, पिंपरीनगर, काळभोरनगर, कासारवाडी, पिंपळे गुरव, फुगेवाडी, निगडी, वाकड, खराळवाडी, भोसरी, थेरगाव, पिंपळे सौदागर, नेहरूनगर, आकुर्डी (उर्दु), रुपीनगर, लांडेवाडी, क्रिडाप्रबोधिनी या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती समाधानकारक ठरली.

शाळा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार संमतीपत्र घेऊन उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांची कोविड टेस्ट करून घेण्यात आली. शाळांचे शंभर टक्के निर्जंतुकीकरण केले. शनिवारीच सर्व शाळांची पाहणी करून आढावा घेतला. त्यामुळे आज यशस्वीपणे शाळा सुरू झाली. शाळेचे मुख्याध्यापक व वर्गशिक्षकांना विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्यास त्याची वेळीच दखल घेऊन त्याच्या पालकांशी संपर्क साधण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती माध्यमिक शिक्षण अधिकारी पराग मुंडे यांनी दिली.