अजित पवारांकडून एक मराठा लाख मराठाच्या घोषणा

बारामती – मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज गोविंद बाग या शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या निवासस्थानासमोर आयोजित आंदोलनात सहभागी होत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकांना धक्काच दिला.
गोविंद बाग या निवासस्थानासमोर आंदोलन असल्याने आज नेमके काय घडणार याची अनेकांना उत्सुकता होती. माध्यमांसह राज्याचे लक्ष या ठिकाणी होते. मात्र अजित पवार भल्यापहाटेच पुण्याहून निघाले आणि सकाळी आठ वाजताच गोविंद बाग येथे पोहोचले.
प्रथम सहयोग या आपल्या निवासस्थानासमोर आंदोलन होणार अशी मला माहिती मिळाली होती. माझ्या घरासमोर आंदोलन होणार असल्याने त्यात सहभागी होण्यासाठी मी आलो होतो. मात्र पवारसाहेबांच्या घरासमोर आंदोलन स्थळ असल्याचे समजल्यावरुन मी येथे आलो, असे स्वतः अजित पवार यांनीच नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सव्वा दहाच्या सुमारास अजित पवार आंदोलनस्थळी आले. इतर कार्यकर्त्यांप्रमाणेच रस्त्यावर मांडी घालून बसले, कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर उभे राहत त्यांनी माईकवरुन एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काच नाह कुणाच्या बापाच…कोण म्हणत देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, अशा घोषणा दिल्या. मराठा समाजातील मुलींनी दिलेले निवेदन स्विकारत आंदोलनाला आपलाही पाठिंबा असल्याचे सांगत ते बाहेर पडले. खुद्द अजित पवार आंदोलनात सहभागी होणार याची कल्पना मोजक्याच लोकांना होती, मात्र कार्यकर्त्यांच्या मांडीला मांडी लावून रस्त्यावर बसत अजित पवार यांनी आपला पाठींबा आज दाखवून दिल्याचीच चर्चा नंतर शहरात होती.