TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी – चिंचवड महापालिकेचा इशारा : ७ दिवसात थकीत एलबीटी भरा, अन्यथा जप्तीची कारवाई

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागामार्फत शहरातील नोंदणीकृत व्यावसायिकांना एलबीटी भरण्याबाबत तीन पथकामांर्फत समक्ष नोटिसा बजाविल्या आहेत. व्यावसायिकांना कागदपत्रे सादर करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे नोंदणीकृत एलबीटी व्यावसायिकांनी पुढील सात दिवसात थकीत एलबीटी भरावा अन्यथा जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपायुक्त स्मिता झगडे यांनी दिला आहे.
राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रात स्थानिक संस्था कर (एलबीटी) १ एप्रिल २०१३ रोजी लागू झाला. २०१३ ते २०१७ पर्यंत एलबीटी लागू होता. ३० जून २०१७ रोजी एलबीटी रद्द करण्यात आला. पिंपरी – चिंचवड शहरातील ३५ हजार ८९२ व्यावसायिकांनी महापालिकेकडे एलबीटीची नोंदणी केली. त्यापैकी आजअखेर केवळ २० हजार २३३ नोंदणीकृत एलबीटी धारकांनी एलबीटी भरला आहे. त्याबाबत अंतिम कर निर्धारण निश्चित करण्याची कार्यवाही सुरु आहे. १५ हजार ६५९ व्यावसीयाकांनी अद्यापही एलबीटी भरला नाही.
नोंदणीकृत एलबीटी धारकांना ई – मेल, एसएमएस, पोस्ट, दुरध्वनीद्वारे वारंवार कागदपत्रे सादर करण्यासाठी विभागामार्फत नोटिसा देण्यात येत आहेत. तथापि, त्यापैकी केवळ १० एलबीटी धारक व्यावसायिकांनीच कागदपत्रे सादर केली. उर्वरित व्यावसायिकांना वारंवार कळवूनही कागदपत्रे सादर न केल्याने ‘बेस्ट’ निकालाच्या आधारे, इतर शासकीय विभागातील उपलब्ध माहितीच्या आधारे एकूण ५ हजार २३८ इतक्या संख्येच्या वार्षिक विवरणपत्रांबाबत नोंदणीकृत एलबीटी धारकांना, व्यावसायिकांना अंतिम कर भरणा निर्धारण आदेश बजाविण्यात आले आहेत.
अद्यापही एलबीटीचा भरणा न केलेल्या नोंदणीकृत व्यावसायिकांना त्वरीत एलबीटी भरण्याबाबत अंतिम सूचना म्हणून समक्ष नोटिसा बजाविल्या जात आहेत. त्यासाठी एलबीटी विभागामार्फत तीन पथके नियुक्त केले आहेत. कोरोना कालावधी लक्षात घेता कागदपत्रे सादर करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र एलबीटीची थकित रक्कम न भरल्यास अथवा कागदपत्रे सादर न केल्यास आपले काहीही म्हणने नाही असे समजून मालमत्ताकर वसुली कार्यवाही प्रमाणेच एलबीटीची थकीत रक्कम वसुल करण्यासाठी जप्ती, अटकावणीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपायुक्त झगडे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button