Mahaenews

पिंपरी- चिंचवड राष्ट्रवादीत मोठी खळबळ; शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना राजीनामा देण्याचे आदेश?

Share On

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी- चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मोठे फेरबदल होणार असून, विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे- पाटील यांच्यासह महिला अध्यक्षा वैशाली काळभोर आणि युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नव्या कार्यकरिणीमध्ये नवोदित चेहेऱ्यांना संधी देण्यात येईल, अशी माहिती प्रदेश राष्ट्रवादीतील सूत्रांनी दिली.

दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शहराध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे, मयूर कलाटे, तसेच अजित पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते संदीप पवार या तिघांची नावे चर्चेत आहेत. तसेच, महिला आघाडी शहराध्यक्षपदासाठी नगरसेविका अर्पणा डोके, वैशाली घोडेकर, तर युवक शहराध्यक्षपदी निहाल पानसरे, अमित गवळी यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

तब्बल सहा वर्ष राष्ट्रवादीचे शहराध्यक्षपदावर राहिलेले संजोग वाघेरे-पाटील, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर आणि राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यांना बुधवारी (दि.24) प्रदेश पातळीवरुन राजीनामा देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. तर युवकचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर हे महाबळेश्वरमधील राज्यस्तरीय शिबिरात सहभागी झाल्याने ते आज उशिरा राजीनामा युवक प्रदेशाध्यक्षाकडे देणार आहेत, असे सांगितले जात आहे.

मात्र, शहराध्यक्ष संजोग वाघेरे- पाटील, विशाल वाकडकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी मुंबईत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. पक्षाचा आदेश आला की, रीतसर पत्रकार परिषद घेऊन राजीनामा दिल्याचे घोषित करण्यात येणार आहे, असे समजले.

Exit mobile version