ताज्या घडामोडीमुंबई

फोन टॅपिंग: रश्मी शुक्ला यांच्या विरोधात ACPची खळबळजनक साक्ष

मुंबई|फोन टॅपिंग प्रकरणात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात कुलाबा पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये त्यांच्याच विभागात काम करणाऱ्या सहायक पोलीस आयुक्तांचा ( एसीपी ) जबाब नोंदविण्यात आला आहे. बेकायदा असल्याने नकार देऊनही शुक्ला यांनी फोन टॅपिंग करायला लावल्याचे या एसीपीने जबाबात म्हटले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे बेकायदा फोन टॅपिंग केल्याप्रकरणी राज्य गुप्तवार्ता पथकाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या विरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी सोमवारी सुमारे ७५० पानांचे आरोपपत्र दाखल केले. संजय राऊत यांच्यासाठी एस. रहाटे आणि खडसेंसाठी खडासने या नावाचा वापर करून हे दोघेही समाजविघातक कृत्य करीत असल्याचे शुक्ला यांनी भासविले. फोन टॅपिंग करताना हे रहाटे किंवा खडासने नसून, राऊत आणि खडसे असल्याचे काही अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. संबंधित सहायक आयुक्तांनी ही बाब शुक्लांच्या निदर्शनास आणून दिली आणि हे योग्य नसल्याचेही सांगितले. मात्र, शुक्ला यांनी भारतीय टेलिग्राफिक अ‍ॅक्ट कलम ४१९- अ चा दाखल देत आपणास अधिकार असल्याचे दाखवून अधिकाऱ्यांना फोन टॅपिंग करायला सांगितले. राज्य गुप्तवार्ता विभागातील अधिकाऱ्यांच्या जबाबामध्ये या बाबींचा उल्लेख असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

वीस शासकीय कर्मचाऱ्यांचे जबाब

रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात कुलाबा पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये २० शासकीय कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले होते. ते जबाबही आरोपपत्रासोबत जोडण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button