ताज्या घडामोडीमुंबई
गुन्हा रद्द करण्यासाठी रश्मी शुक्ला यांची याचिका
मुंबई | बेकायदा दूरध्वनी अभिवेक्षण (फोन टॅपिंग) केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेतली.
राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांच्या दूरध्वनीचे बेकायदा अभिवेक्षण केल्याप्रकरणी शुक्ला यांच्यावर कुलाबा पोलिसांनी ५ मार्चला गुन्हा दाखल केला होता. त्याच्या एक दिवस आधीच बेकायदा दूरध्वनी अभिवेक्षण केल्याप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात उच्च न्यायालयाने शुक्ला यांनी अटकेसारख्या कठोर कारवाईपासून संरक्षण दिले होते. गुन्हा नोंदवण्यात तीन वर्षांचा विलंब झाल्याचे सकृतदर्शनी निरीक्षण नोंदवून न्यायालयाने शुक्ला यांना दिलासा दिला होता.