ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रुग्ण, नातेवाईकांसोबत सौजन्याने वागा, अन्यथा कारवाई

महापौरांचा वायसीएममधील कर्मचा-यांना इशारा

पिंपरी चिंचवड | पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये शहरातील तसेच शहराबाहेरील रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र रुग्णालयाचे काही कर्मचारी रुग्ण आणि नातेवाईकांसमवेत सौजन्याने वागत नाही अशा तक्रारी प्राप्त होत आहेत. ही बाब योग्य नसून अशा प्रकारची वर्तणूक करणा-या कर्मचा-यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा महापौर उषा ढोरे यांनी दिला आहे.महापौर ढोरे यांनी यशवंतराव स्मृती रुग्णालयाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी महापौरांच्या समवेत उपमहापौर हिराबाई घुले, शहर सुधारणा सभापती अनुराधा गोरखे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, यशवंतराव स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.राजेंद्र वाबळे, ब्रदर विजय दौंडकर आदी उपस्थित होते.

महापौर ढोरे यांनी रुग्णालयातील प्रसुति कक्षामध्ये जाऊन दाखल रुग्णांसोबत संवाद साधला. रुग्णालयाच्या व्यवस्थापनाव्दरे रुग्णांना दिल्या जाणा-या वागणुकीबद्दल देखील त्यांनी विचारणा केली. त्या म्हणाल्या, वायसीएम रुग्णालयाने शहर तसेच शहराबाहेरील रुग्णांना देखील उत्तम सेवा दिली आहे. रुग्णसेवेबाबत या रुग्णालयाने नावलौकीक मिळवला आहे. या रुग्णालयाबाबत जनतेच्या मनात आदर आणि आस्था आहे. विविध आजारांवरील उपचाराबरोबरच दुर्मिळ शस्त्रक्रिया देखील या रुग्णालयात झाल्या आहेत.

कोविड काळात या रुग्णालयामार्फत दिलेली सेवा वाखाणण्यासारखी असून वायसीएम रुग्णालयाची प्रतिमा यामुळे उंचावली आहे. मात्र या ठिकाणी उपचारासाठी येणा-या रुग्णांसमवेत तसेच त्यांच्या नातेवाईकांसोबत काही कर्मचारी सौजन्याने वागत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा तक्रारी आल्याने आपल्या चांगल्या कामावर पाणी पडते. म्हणून रुग्णालयाच्या सर्व कर्मचा-यांनी रुग्णसेवा देताना नागरिकांशी सौजन्याने वागले पाहिजे असे महापौर ढोरे म्हणाल्या.

याबाबत रुग्णालय प्रमुखांनी व्यक्तीश: लक्ष घालावे. नागरिकांशी उध्दट वर्तन करणा-या तसेच सौजन्याने न वागणा-या कर्मचा-यांवर कारवाई करावी अशा सूचना महापौर ढोरे यांनी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांना दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button