breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांवर पक्षश्रेष्ठींचा ‘अविश्वास’

  • उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वयीत
  • प्रदेश पातळीवरील पदाधिकाऱ्यांवर ‘लोकल’ जबाबदारी

पिंपरी ।विशेष प्रतिनिधी

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या प्रदेश नेतृत्त्वाने स्थानिक नेत्यांना बाजुला करीत पिंपरी-चिंचवडमधील सूत्रे स्वत:च्या हातात घेतली आहेत. पक्षाचे ‘कारभारी’तथा पालकमंत्री अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. पण, तरीही पिंपरी-चिंचवडमध्ये आठवड्यातून एकदा उपमुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक पक्षकार्यालयात तळ ठोकून आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा स्थानिक नेत्यांवर विश्वास नाही किंवा स्थानिक नेत्यांची क्षमता नाही, असे दोन मुद्दे अधोरेखित होतात.

वास्तविक, उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक कामे स्थानिक पातळीवर सोडवण्यासाठी प्राधान्य दिले, ही बाब स्वागतार्हच आहे. परंतु, शहरातील पदाधिकारी, शहराध्यक्ष, आमदार, माजी आमदार, माजी नगरसेवक इतका मोठा डामडौल असतानाही अजित पवारांना पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी लागते, ही बाब स्थानिक नेत्यांची अकार्यक्षमता सिद्ध करण्यास पुरेशी आहे.

अजित पवार राज्यातील कोणत्याही नागरिकाला ‘इजी टू अवेलेबल’ आहेत. पिंपरी-चिंचवडमधील कामांसाठी मुंबईत किंवा पुण्यात होणारी गर्दी कमी करण्यासाठी त्यांनी पिंपरी-चिंचवडमध्येच यंत्रणा कामाला लावली. वास्तविक, स्थानिक पातळीवर अशी यंत्रणा असणे अपेक्षीत आहे, पण तसे झाले नाही.

जनसंवाद, राष्ट्रवादी परिवार संवाद आणि हार-तुरे घेण्यात व्यस्त असलेले नवनिर्वाचित शहराध्यक्ष अजित गव्हाणे यातून काही बोध घेणार आहेत का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे राष्ट्रवादीला फटका बसणार, असे निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवत आहेत.

स्थानिक नेत्यांची दातखीळ बसते का?

उत्तर कोल्हापूर  पोटनिवडणुकीचा निकाल समोर आला. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी बाजी मारली. त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात राष्ट्रवादीचे स्थानिक नेते कमी पडले. विशेष म्हणजे, गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा संदर्भ देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष व प्रवक्ते रविकांत वरपे यांनी भाजपाचे आमदार व शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्यावर टीका केली. ‘‘गोव्याच्या विजयाचे श्रेय घेणारे लांडगे, कोल्हापूरच्या पराभावाची जबाबदारी स्वीकारणार का?’’ असा सवाल उपस्थित केला. वास्तविक, राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष, निवडणूक प्रभारी यांच्यासह आजी-माजी आमदार यांनी भाजपाच्या स्थानिक नेत्यांना ‘‘लक्ष्य’’ केले पाहिजे. मात्र, तसे होत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी ‘प्लस पाईंट’ असलेल्या मुद्यांवर बोलवण्यास स्थानिक नेत्यांची दातखीळ बसते का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच, वरपेंना जे सूचले, ते स्थानिक पदाधिकाऱ्यांना का सुचले नाही, हाही कळीचा मुद्दा आहे.

स्थानिक पातळीवर कुशल नेतृत्व विकसित व्हावे…

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर कुशल नेतृत्व विकसित व्हावे, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून संघटनात्मक बदल घडवण्यात आले आहेत. मात्र, शहरातील महत्त्वपूर्ण विषयांवर नवीन पदाधिकारी अभ्यासपूर्ण बोलताना दिसत नाही. विकासाच्या मुद्यांवर भाजपाची कोंडी करणे अपेक्षीत आहे. मात्र, आरोप-प्रत्यारोपांमध्ये वेळकाढूपणा करीत स्थानिक नेते राष्ट्रवादीला पराभवाच्या खाईत ढकलत आहेत, असे चित्र निर्माण झाले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button