breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंढरीचा विठुराया महिनाभर रजेवर! चंद्रभागेतील विष्णूपद मंदिरात राहणार

पंढरपूर – अठ्ठावीस युगांपासून कर कटेवर ठेवून उभा असलेल्या वारकरी आणि सर्वांचा लाडका विठुराया सध्या मार्गशीर्ष महिन्यात चंद्रभागेतील विष्णूपद मंदिरात वास्तव्याला आहे. विठुराया तब्बल महिनाभर रजेवर असून तो या मंदिरात विश्रांती घेणार आहे.

आषाढी यात्रेनंतरचा चातुर्मास आणि नंतर आलेली कार्तिक यात्रा यामुळे शिणलेला विठुराया मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतीक्षेत असतो आणि हेमंत ऋतूचे वेध लागताच त्याला विष्णूपदावर येण्याची ओढ सुरू होते. यंदा कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे संकट दिसत असल्याने विष्णूपदावर येणाऱ्या भाविकांना तापमान चाचणी करून आणि सॅनिटायझर मारूनच सोडले जाणार आहे. पंढरपूरपासून जवळ असलेल्या गोपाळपूरनजिक चंद्रभागेच्या पात्रात एक पुरातन मंदिर आहे. या मंदिराला विष्णूपद मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराबाबत पद्म पुराणात एक आख्यायिका सांगण्यात आली आहे. जेव्हा रुक्मिणी विठुरायावर रुसून दिंडीर वनात आली. तेव्हा देवीच्या शोधात विठुराय पंढरपुरात सर्वात प्रथम ज्या ठिकाणी आले. ते ठिकाण म्हणजे चंद्रभागेच्या पात्रातील मोठा खडक. याठिकाणी एका मोठ्या शिळेवर मध्यभागी देवाचे समचरण आणि देहुडाचरण पावलं उमटलेली आहेत. त्यासोबत काठी ठेवल्याची आणि काल्याच्या वागड्याची खूण दिसते. या शिळेवर दगडी मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपाच्या खांबावर चतुर्भुज समचरण विष्णूमूर्ती आणि देहुडाचरण मुरलीधराची मू्र्ती कोरण्यात आली आहे.

विठ्ठलाने या ठिकाणी आपले सवंगडी आणि गाईंसह क्रीडा केल्या. या ठिकाणी सर्वांनी भोजन केले. तेव्हा इथे देवाची आणि गाईची पावलं उमटली. विठ्ठल हे विष्णूचे अवतार असल्याने इथे उमटलेल्या पावलांमुळे या चंद्रभागेतील खडकावरील ठिकाणाला विष्णूपद असे नाव मिळाले. मार्गशीर्ष महिन्यात विठुराया याठिकाणी राहायला येतो, असे मानले जाते. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात याठिकाणी भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. पंढरपुरातील भाविक जेवणाचे डबे घेऊन याठिकाणी येतात आणि दर्शन घेऊन झाल्यावर वनभोजनाचा आनंद लुटतात. मार्गशीर्ष शुद्ध वारीला पंढरपुरात आलेल्या वारकऱ्यांच्या दिंड्याही बारस सोडण्यासाठी विष्णूपदावर येत असतात.

मार्गशीर्ष आमावस्येला विठुराया पंढरपुरातील मंदिरात परत जातात. त्या दिवशी संध्याकाळी विष्णूपदावर एक रथ आणला जातो. या रथाला ज्वारीच्या ताटं लावून सजवला जातो. विष्णूपदावर अभिषेक करून मग दिंडी काढली जाते आणि विठ्ठल पु्न्हा पंढरपुरातील आपल्या मंदिरात विराजमान होतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button