ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाशिक : उन्हाची तीव्रता वाढताच, साथीच्या आजारांचा शहरातून काढता पाय!

नाशिक : शहरवासीयांना करोनाच्या तिसऱ्या लाटेतून दिलासा मिळाला असतानाच, उन्हाची तीव्रता वाढताच, डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया या साथीच्या आजारांनी शहरातून काढता पाय घेतला आहे. मार्च महिन्यात डेंग्यूचे जेमतेम दोन, तर चिकनगुनियाचा एकच रुग्ण आढळला आहे. मलेरियाचा एकही रुग्ण या महिन्यात आढळून आला नसल्याची माहिती महापालिकेचे जीवशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी दिली. त्यामुळे करोना महामारीपाठोपाठ डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनियासारख्या किटकजन्य आजारांवरही नियंत्रण मिळविण्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाला यश आले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून करोनाने थैमान घातले होते. करोनापाठोपाठ गेल्या दोन वर्षापासून डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू, चिकुनगुनिया या साथीच्या आजारांनीही डोक वर काढले होते. करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या आता शुन्यावर आली असून, शहरात आता करोनाचे जेमतेम आठ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण शिल्लक राहिले आहेत.

करोनाबरोबरच डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनियाचेदेखील अनेक रुग्ण आढळून येत होते. गेल्या वर्षी नोव्हेंबर, डिसेंबरमद्ये तर डेंग्यूचे विक्रमी रुग्णसंख्या आढळून आली होती. करोनाच्या प्रादुर्भावामुळे स्वाईन फ्लूची चाचणी शासकीय व मनपा रुग्णालयांमध्ये बंद करण्यात आली होती. त्यामुळे करोनाकाळातील प्रामुख्याने स्वाइन फ्लूची निश्चित आकडेवारी समोर येऊ शकली नव्हती. करोना संपला असतानाच आता डेंग्यू, मलेरियानेही विश्रांती घेतल्याचे आकडेवारीत दिसत आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात डेंग्यूचे तब्बल ११ नवे बाधित आढळून आले होते. यावर्षी मात्र डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियाची चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. चाचण्यांची संख्या वाढवूनदेखील बाधितांचा आकडा मात्र गतवर्षीच्या तुलनेत अल्प राहिला आहे. यंदाच्या मार्च महिन्यात डेंग्यूचे जेमतेम दोन, तर चिकुनगुनियाचा एकच रुग्ण आढळला आहे. मलेरियाचा एकही रुग्ण मार्च महिन्यात आढळून आला नसल्याचा दावा डॉ. त्र्यंबके यांनी केला. डेंग्यू, चिकुनगुनियासारख्या आजारांविषयी महापालिकेच्या जनजागरण मोहीम आणि उपाययोजनांमुळे या आजारांच्या रुग्णसंख्येत घट झाल्याचे डॉ. त्र्यंबके यांचे म्हणणे आहे.

पावसाळ्याची तयारी आतापासूनच

डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांना प्रतिबंध केला जाणार आहे. या रोगराईला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या मलेरिया विभागातर्फे डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्यासाठी सर्वेक्षण आतापासूनच सुरू केले जाणार आहे. डासांची उत्पत्तीस्थाने शोधून ती नष्ट केली जाणार आहे. याशिवाय घरोघरी तसेच खासगी आस्थापना, शासकीय कार्यालयांच्या ठिकाणीदेखील डासांच्या उत्पत्तीस्थानांचा शोध घेऊन संबंधितांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचेही डॉ. त्र्यंबके यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button