breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

पालघरमध्ये नैसर्गिक वायु वितरण वाहिनीच्या प्रस्तावित योजनेसाठी जन सुनावणीचे आयोजन

पालघर |

पालघर जिल्ह्यातील डहाणू व वसई तालुक्यातून जाणाऱ्या घरगुती नैसर्गिक वायु वितरण वाहिनीच्या प्रस्तावित योजनेसाठी पर्यावरणीय सार्वजनिक जन सुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. ही जनसुनावणी जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, गुजरात गॅस लिमिटेड कंपनीच्या प्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. ही जनसुनावणी गुरुवार (२७ जानेवारी) रोजी पालघर शहरातील अंगण विवाह सभागृह-मैदान, सातपाटी रोड, टेंभोडे येथे सकाळी साडेअकरा वाजेपासून सुरू होणार आहे.

घरगुती वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या वितरण वाहिनीच्या प्रस्तावित योजनेसाठी पर्यावरणीय प्रभावी मूल्यांकन करण्यात आले आहे. तरी पर्यावरणदृष्ट्या विविध परवानग्या घेण्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांच्या सूचना व हरकती लक्षात घेण्यासाठी ही जनसुनावणी आयोजित केली आहे. डहाणू तालुक्यातील बावीस गावांमधून ही भूमिगत नैसर्गिक वितरण वाहिनी जात आहे. तर वसई तालुक्यातील काही गावांचा यामध्ये समावेश आहे. सुमारे ४५ किलोमीटर लांबीची प्रमुख वाहिनी यासह १४ किलोमीटर इतर भूमिगत वितरण वाहिनी या योजनेत प्रस्तावित आहे. या योजनेसाठी ५० कोटींपेक्षा जास्त निधी खर्च होणार आहे. दरम्यान, बोईसर ते डहाणू अशी सुमारे आठ किलोमीटर वितरण वाहिनी अपेक्षित आहे, या वितरण वाहिनीमध्ये उंबरगाव ते घोलवड परिसरातील ६.२२ किमी तर बोईसर ते डहाणू परिसरातील सुमारे ८ किमीची वितरण वाहिनी सागरी किनारा नियमन क्षेत्रातून (सीआरझेड) मधून जात आहे.

डहाणू तालुका पर्यावरण दृष्टीने संवेदनशील असल्यामुळे या भूमिगत वितरण वाहिनी बाबत डहाणूसह वसई येथील नागरिकांचे आक्षेप सूचना व हरकती या जनसुनावणीमध्ये नोंदवल्या जाणार आहेत. त्या नोंदवल्यानंतर त्यांची पूर्तता केली जाईल व त्यानंतरच या प्रकल्पाला इतर परवानग्या मिळणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी जनसुनावणी मध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी केले आहे. डहाणू तालुक्यातील बोर्डी, घोलवड, कालवली, वाणगाव, खंबाळे, कापसी, डेहणे, पळे, मोट पाडा, सावटा, सरावली, डहाणू, मुसल पाडा, कंकराडी, घाटोळ पाडा ,भुयोळपाडा, दोनापाडा, बोरीपाडा, डोंगरी पाडा,खडक पाडा,खांडवा अशा गावातून भूमिगत वाहिनी जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button