breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीत संघटनात्मक बदल निश्चित; अधिवेशनानंतरचा मुहुर्त!

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत
  • विद्यमान शहराध्यक्ष बदलाची शक्यता

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदल करण्यात येणार आहेत. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनानंतर निर्णय घेणार आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीत आता नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार? याबाबत पदाधिकारी- कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीचे कारभारी म्हणून विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील गेली सहा वर्षे म्हणजेच दोन टर्म जबाबदारी सांभाळली.

वास्तविक, लोकसभा (२०१९), विधानसभा (२०१९) निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाची कामगिरी समाधानकरक राहिली नाही. राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा मतदार संघांतर्गत चिंचवड आणि पिंपरी विधानसभेत पक्ष पिछाडीवर राहिला. त्यापूर्वी झालेल्या महापालिका (२०१७) निवडणुकीत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसावे लागले. विधानसभा निवडणुकीतही चिंचवड आणि भोसरीत पक्षाला अधिकृत उमेदवारही देता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे.

स्थानिक पातळीवर प्रभावी चेहरा हवा…

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी केवळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चेहऱ्यावरच लढणार हे निश्चित आहे. मात्र, अजित पवार आणि युवा नेते पार्थ पवार यांच्यात समन्वय साधून

स्थानिक पातळीवर प्रभावी काम करणारा नवीन चेहरा शहराध्यक्षपदी नेमावा, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.

…ही नावे आहेत आघाडीवर!

शहराध्यक्षपदाच्या रेसमध्ये पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीतील गट-तटांमधून काही नावे आघाडीवर आहेत. ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांचे निकटवर्ती माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, माजी आमदार विलास लांडे यांचे निकटवर्ती नगरसेवक अजित गव्हाणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निष्ठावंत आणि पार्थ पवार यांचे निकटवर्ती अशी ओळख असलेले संदीप पवार यांची नावे शहराध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. विशेष म्हणजे, माजी आमदार विलास लांडे यांनीही शहराची धुरा सांभाळण्याची तयारी दर्शवली आहे, अशी चर्चा आहे.

युवकाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या सूचना…

राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी काही दिवसांपूर्वी शहरात एका कार्यक्रमानिमित्त हजेरी लावली होती. त्यावेळी स्थानिक युवक आघाडीत बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे चाचपणी सुरू करा, अशा सूचना युवक सेलच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. दुसरीकडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही शहरात भेट दिल्यानंतर नवोदितांना पक्षसंघटनेत संधी दिली जाईल, असे सूतोवाच केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीत लवकरच खांदेपालट होईल, असे संकेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button