breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

जातीवाचक आडनावं बदलण्यासाठी ‘ऑपरेशन सरनेम सर्जर’ मोहीम

अहमदनगर |

जातीयवाद संपविण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून राज्य सरकारनं जातीवाचक गावं आणि वाड्या वस्त्यांच्या नावांमध्ये बदल करण्याची योजना आणली आहे. अनेक ठिकाणी यानुसार नावं बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, अनेकांचीही आडनावं ही जातीवाचक असतात. ती बदलण्यासाठी नगरमधील पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीनं ‘ऑपरेशन सरनेम सर्जरी’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या चळवळीद्वारे लोकांना प्रोत्साहन देऊन त्यांची अशी आडनावं बदलण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. एकाचववेळी मोठ्या संख्येनं असे बदल करून गॅझेटमध्ये आणि नंतर विविध कागदपत्रांवरील अडनावं बदण्याची ही मोहीम असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

यासंबंधी माहिती देताना अ‍ॅड. गवळी यांनी सांगितलं, ‘अनेक आडनावे अशी आहेत की, त्यावरून त्या व्यक्तीची जात समजते. त्यावरून अनेकांचे सामाजिक अवमूल्यन होतं. त्यामुळे ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. तंत्रज्ञानानं प्लास्टिक सर्जरी करून माणसाच्या शरीरावरील विद्रूप भाग बाजूला करून नव्यानं सौंदर्य निर्माण करता येते. या तत्त्वावर ऑपरेशन सरनेम सर्जरी राबवली जाणार आहे. कारण जाती व्यवस्था हाही आपल्या समाजाला लागलेला कलंक आहे. भारतातील वर्ण आणि जाती व्यवस्थेमुळं माणसाचं सामाजिक अमुल्यन होतं. याला व्यक्तीचं आडनाव कारणीभूत ठरतं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही वर्ण आणि जातीव्यवस्था टिकून आहे. जातिव्यवस्थेला खतपाणी घालण्यासाठी भारतातील राजकारणी कारणीभूत ठरतात. त्याशिवाय दरवर्षी लाखो लोक जातीवर आधारित आरक्षण मागण्यांसाठी मोर्चे आंदोलनं करतात.

एकंदरीत जातव्यवस्था मोडीत काढण्याएवजी ती प्रबळ ठरत आहे. राजकारण्यांनी जात व्यवस्था मोडीत काढण्यासाठी कायदे करण्याची मानसिक तयारी दाखवलेली नाही. ज्या समाजात मुला-मुलींचे संगोपन होते, त्याशिवाय आजूबाजूचा परिसर या सर्व गोष्टी जातसंस्था बळकट करण्यास कारणीभूत ठरतात. जातीचं मूळ समाजाच्या इतर घटकांमध्ये जेवढं आहे, त्याच्या शेकडो पटीनं व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये असल्याचं मानसशास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे. व्यक्तीची जात ही अनेकदा त्यांच्या आडनावातून स्पष्ट होते. ज्या आडनावामुळं जात स्पष्ट होते व मानवी सामाजिक अवमूल्यन होतं. अशी सर्व आडनावं कायद्यानं बदलण्याचा अधिकार व्यक्तीला आहे. एक चळवळीद्वारे अशी आडनावं सोयीस्कररितीनं बदलता येणार आहेत. त्यासाठी एकाच वेळेला सरकारी गॅझेटमध्ये प्रसिद्धी, रेशन कार्डावर आडनाव नोंदीचा बदल, जातीच्या दाखल्यावर आडनाव बदल अशा सर्व गोष्टी कायद्यानं करता येणार आहेत,’ असेही अ‍ॅड. गवळी यांनी सांगितलं.

या मोहिमेसाठी अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, हिराबाई ग्यानप्पा, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, नाना डोंगरे, जालिंदर बोरुडे, विजय भालसिंग, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button