breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

चारचाकीवाल्यांनाच पेट्रोल लागतं, ९५ टक्के भारतीयांना पेट्रोलची गरज नाही; योगींच्या मंत्रीमंडळामधील मंत्र्याचं तर्क

उत्तरप्रदेश |

आसाम भाजपाचे अध्यक्ष भाबेश कालिता यांनी पेट्रोलच्या दरांसंदर्भात भाष्य करताना, पेट्रोलचे दर २०० रुपये लिटरच्या पुढे गेल्यास ट्रीपल सीट प्रवास करण्याची मूभा दिली जाईल असं म्हटलं होतं. या वक्तव्याची चर्चा सुरु असतानाच आता पुन्हा एकदा भाजपाच्या आणखीन एका नेत्याने पेट्रोल दरवाढीसंदर्भात विचित्र तर्कट मांडलं आहे. भारतामध्ये चारचाकी गाड्या चालवणाऱ्या मोजक्या लोकांना पेट्रोलची गरज असते. ९५ टक्के भारतीयांना पेट्रोलची गरज नाहीय, असं वक्तव्य उत्तर प्रदेशमधील मंत्री आणि भाजपाचे नेते उपेंद्र तिवारी यांनी केलं आहे. एएनआयने यासंदर्भातील व्हिडीओ पोस्ट केलाय.

गुरुवारी इंधनाचे दर सलग दुसऱ्यांदा वाढल्यानंतर त्याच दिवशी प्रसारमाध्यमांशी बोलताना तिवारी यांनी या अजब दावा केलाय. जालाऊन शहरामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असताना तिवारी यांनी इंधनदरवाढीवरुन विरोधकांवरच टीका केली. विरोधकांकडे सरकारवर टीका करण्यासाठी काही मुद्दा नाहीय म्हणून ते इंधनदरवाढीबद्दल बोलत असल्याची टीका तिवारी यांनी केली. “सरकारने करोनाच्या लसी आणि करोनावरील उपचार मोफत पुरवले आहेत. इंधनाचे दर वाढलेले नाहीत. तुम्ही जर दरडोई उत्पन्न आणि इंधनाच्या दरांमध्ये झालेली वाढ याची तुलना केली तर इंधनाचे दर फार कमी आहेत,” असा युक्तीवाद तिवारी यांनी केला.

उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असणाऱ्या तिवारी यांनी योगी आदित्यनाथ हे राज्यात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात सत्तेत आल्यापासून दरडोई उत्पन्नामध्ये दुप्पटीने वाढ झाल्याचा दावा केलाय. मात्र तिवारी यांनी केलेला हा दावा चुकीचा आहे. वर्ल्ड बँकच्या आकडेवारीनुसार मोदी २०१४ साली सत्तेत आले तेव्हा भारतामधील दरडोई उत्पन्न हे १ लाख १६ हजारांच्या आसपास होतं. २०२० मध्ये हा आकडा १ लाख ४२ हजारांच्या आसपास गेलाय. इंधनदरवाढ हा सध्या देशातील ज्वलंत विषय आहे. रोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. मागील २० दिवसांमध्ये तब्बल १५ वेळा इंधनदरवाढ झालीय. या इंधनदरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसतोय. इंधनाचे दर कमी होण्याची सध्या तरी काही चिन्हं दिसत नाहीयत. या इंधनदरवाढीबद्दल सर्व सामान्यांमध्ये चिंतेचा स्वर उमटताना दिसत आहे. मात्र ही दरवाढ योग्य किंवा अनिवार्य असल्याचे खुलेसा करताना सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे नेते वाटेल ती स्पष्टीकरणं देत आहेत. तालिबानला दोष देणं, मोफत लस दिल्यामुळे इंधन भडका झाला म्हणणं किंवा इंधनाचे दर वाढलेत तर सायकल चालवा ती आरोग्यासाठी फायद्याची असते असा युक्तीवाद करण्याचे प्रकार भाजपा नेत्यांनी यापूर्वी केले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button