breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

विधान परिषदेतील भाजपचे एकतृतीयांश आमदार ‘उपरे’

मुंबई |

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने आयारामांना संधी देण्याची परंपरा कायम ठेवली असून, वरिष्ठ सभागृहातील पक्षाच्या एकूण आमदारांपैकी एकतृतीयांश हे अन्य पक्षांतून भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यापैकी तीन जण पूर्वाश्रमीचे काँग्रेसमध्ये आमदार वा पदाधिकारी होते. एक जण भाजपमध्ये कधीच सक्रिय नव्हता. अन्य पक्षांतून आलेल्यांना महत्त्व मिळत असल्याने भाजपमधील जुन्याजाणत्या नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांमध्ये साहजिकच नापसंतीची प्रतिक्रिया उमटते.

विधान परिषदेत आधीच भाजपच्या एकूण आमदारांपैकी आयारामांची संख्या एकतृतीयांश आहे. भाजपचे सध्या २३ आमदार असून, यापैकी नऊ जण अन्य पक्षांतून भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. पक्षवाढीसाठी आयारामांना महत्त्व देऊन त्यांना आमदारकी देण्यात आली. त्याचा पक्षाला कितपत फायदा झाला याबद्दल पक्षात तीव्र प्रतिक्रिया आहेच. विधान परिषदेतील पक्षाचे नेते व विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यापासूनच सुरुवात होते. दरेकर हे आधी मनसेचे आमदार होते. शिवसेना, मनसे असा प्रवास करून ते भाजपवासी झाले.

रणजितसिंह मोहिते-पाटील, निरंजन डावखरे, सुरेश धस, विनायक मेटे हे यापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार होते. अमरिश पटेल हे काँग्रेसचे आमदार होते. निलय नाईक, प्रसाद लाड हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते. कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेशदादा पाटील हे यापूर्वी कधीच भाजपमध्ये नव्हते. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे अन्य पक्ष किंवा संघटनांमधून भाजपमध्ये दाखल झालेले. भाजपच्या नऊ आमदारांचे मार्ग पूर्वी वेगळे होते. भाजपने नव्याने उमेदवारी दिलेले राजहंस सिंह, अमरिश पटेल किंवा अमल महाडिक हे पूर्वी काँग्रेस पक्षाशी जोडले गेले होते वा त्यांचे काँग्रेसशी संबंध होते. राजसंह सिंह हे काँग्रेसचे आमदार तसेच मुंबई महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते होते. अमरिश पटेल हे काँग्रेस सरकारमध्ये मंत्रीपदी होते. अमल महाडिक हे भाजपचे माजी आमदार असले तरी त्यांचे कुटुंबीय काँग्रेसमध्ये होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button