ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड पोलीस भरती परीक्षेला एक लाख सात हजार उमेदवार गैरहजर; 98 गुणांसह दोघेजण अव्वल तर सहा जणांना मिळाला ‘भोपळा’

पिंपरी-चिंचवड पोलीस भरतीचा निकाल जाहीर

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा 19 नोव्हेंबर रोजी पार पडली. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. 100 गुणांच्या या लेखी परीक्षेत दोन उमेदवारांना सर्वाधिक 98 गुण मिळाले आहेत. तर सहा उमेदवारांना चक्क शून्य गुण मिळाले आहेत. राज्यात सुरु असलेल्या एसटी संपामुळे अर्ध्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचता आले नाही. त्यामुळे हे विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले.पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस शिपाई पदाच्या 720 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी पहिला टप्पा म्हणून लेखी परीक्षा घेण्यात आली. 720 जागांसाठी राज्यभरातून तब्बल एक लाख 89 हजार 732 अर्ज आले होते. या उमेदवारांची 19 नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा झाली. पुणे, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर या जिल्ह्यातील 444 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडली.

या परीक्षेला एक लाख सात हजार 124 विद्यार्थी गैरहजर राहिले. राज्यात सुरु असलेल्या एसटी संपाचा पोलीस भरतीची परीक्षा देणा-या उमेदवारांना मोठा फटका बसला आहे. अनेकांना परीक्षा केंद्र असलेल्या शहरात जाण्यासाठी वाहन मिळाले नाही. 720 जागांसाठी एक लाख 89 हजार 732 अर्ज आल्याने पिंपरी-चिंचवड शहरात एकाच वेळी एवढ्या परीक्षार्थींची परीक्षा घेणे शक्य नसल्याने सहा जिल्ह्यात ही परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. दरम्यान परीक्षेचे नियोजन पूर्ण न झाल्याने चार वेळेला ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून उमेदवारांना सोयीचे होईल, असे परीक्षा केंद्र देण्यात आले होते. तरीही राज्याच्या 36 जिल्ह्यातून अर्ज आल्याने अनेकांची तारांबळ उडाली. ज्या शहरात परीक्षा केंद्र आहे, तिथे किमान आदल्या दिवशी पोहोचून परीक्षा केंद्र कुठे आहे हे पाहणे तसेच राहण्याची व्यवस्था करणे उमेदवारांना आवश्यक होते. त्यात एसटी कर्मचा-यांचा संप असल्याने उमेदवारांना हे नियोजन करता आले नाही. परिणामी त्यांना परीक्षेला हजर राहता आले नाही.

एक लाख 89 हजार 732 पैकी 82 हजार 608 उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली आहे. तर एक लाख सात हजार 124 उमेदवार गैरहजर राहिले आहेत. परीक्षा दिलेल्या उमेदवारांमध्ये दोन उमेदवारांना सर्वाधिक 98 गुण मिळाले आहेत. तर 615 उमेदवारांना 90 पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.

काही उमेदवारांचा पहिला प्रयत्न होता. तर काहींनी या परीक्षेला गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे सहा उमेदवारांना अक्षरशः शून्य गुण मिळाले आहेत. तर 41 जणांना 10 देखील गुण मिळालेले नाहीत. केवळ एक गुण घेणारा एकमेव उमेदवार आहे. या लेखी परीक्षेचा वर्गवारीनुसार 1:10 या प्रमाणे निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. मैदानी चाचणी देखील लवकरच घेतली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button