TOP Newsपिंपरी / चिंचवडपुणे

जिल्ह्यात ‘सात बारा’ रोजी होणार एक लाख मोफत ‘सातबारा’ वाटप

पुणे l  प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात 7 डिसेंबरचे (7-12-2021) औचित्य साधून एकाच दिवसात एक लाख मोफत सातबारा वाटपाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

महसूल व वनविभागाच्या 1 सप्टेंबर 2021 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील शेतकऱ्याना मोफत सुधारित 7/12 वाटप करण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेनुसार जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुधारित नमुन्यातील डिजिटल स्वाक्षरीत 7/12 मोफत वाटप करण्याचा शुभारंभ महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पुरंदर तालुक्यातील खळद येथे करण्यात आला होता.

जिल्ह्यात एकूण खातेदारांची संख्या 12 लाख 34 हजार 471 इतकी असून त्यापैकी 5 डिसेंबरपर्यंत अखेरपर्यंत 10 लाख 10 हजार 278 सातबारा मोफत वाटप करण्यात आले आहेत.  उर्वरित 2 लाख 24 हजार 193 सातबारा वाटप करावायाचे आहेत. यापैकी 7 डिसेंबरचे (7-12) औचित्य साधून एकाच दिवसात 1 लाख 7/12 वाटप करण्याचे नियोजन जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी केलेले आहे. एकूण 557 सजांच्या गावी तलाठ्यांकडून  मोफत 7/12 चे वाटप करण्यात येणार आहे.

शासन निर्णयानुसार लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून मंडळ स्तरावर दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालती आयोजित करण्यात येवून जनतेच्या प्रलंबित साध्या/वारस/तक्रारी फेरफार नोंदी निर्गत करण्यात येत आहेत. कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी झाल्याने मागील महिन्यात झालेल्या फेरफार अदालतीमध्ये 3 हजार 369 इतक्या नोंदी निर्गत झालेल्या आहेत. डिसेंबर महिन्यात दुसऱ्या बुधवारी 8 डिसेंबर 2021 रोजी तालुक्यात क्षेत्रीय स्तरावर फेरफार अदालत आयोजित करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात 6 डिसेंबरपर्यंत मुदत पूर्ण झालेल्या 11 हजार 789  नोंदी प्रलंबित असून या नोंदीमध्ये प्रामुख्याने साध्या / वारस / तक्रार व मुदत पूर्ण झालेल्या सर्व प्रकारच्या नोंदी निर्गती करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील कुळकायदा शाखेकडून  संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार जास्तीत जास्त नोंदी निर्गत करण्याच्यादृष्टीने फेरफार अदालतीमध्ये प्रयत्न केले जाणार आहेत. फेरफार अदालतीसाठी प्रत्येक मंडळ स्तरावर संपर्क अधिकारी यापूर्वीच नियुक्त केले आहेत.

उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांनादेखील काही फेरफार अदालतीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. 8 डिसेंबर रोजी होणाऱ्या फेरफार अदालतीमध्ये फेरफार नोंदी प्रलंबित असलेल्या व्यक्तींनी संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित राहून मंडळ अधिकारी यांना आवश्यक ते कागदपत्र उपलब्ध करून द्यावीत आणि  आपल्या नोंदी निर्गत करून घ्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button