breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

ठाकरे सरकारच्या निषेधार्थ भाजपाचे एक लाख कार्यकर्ते काळ्या फिती लावून आंदोलन करणार!

मुंबई |

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अल्प मदत देणाऱ्या ठाकरे सरकारच्या काळ्या कारभाराच्या निषेधार्थ येत्या १ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील एक लाख कार्यकर्ते काळ्या फिती लावून अभिनव आंदोलन करतील, असे प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला प्रदेश पॅनेलिस्ट प्रेरणा होनराव उपस्थित होत्या. मागील दोन वर्षांपासून वादळे, अतिवृष्टी, नापिकीमुळे भरडल्या गेलेल्या शेतकऱ्याच्या हातात सरकारी मदतीचा एक पैसा देखील पडलेला नसल्याने, राज्यातील शेतकऱ्याची सरकारने फसवणूक केली आहे. शेतकऱ्याच्या या संतापात सहभागी होऊन त्यांच्या व्यथांना वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन असेल, अशी माहिती उपाध्ये यांनी यावेळी दिली.

याचबरोबर, “उपाध्ये यांनी सांगितले की, ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यांतच राज्यात निसर्ग वादळामुळे वाताहत झाली. हजारो शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त झाली आणि पुढील किमान दहा वर्षे पुन्हा उभे राहता येणार नाही, अशी अपरिमित हानी झाली. या शेतकऱ्यांकरिता ठाकरे सरकारने मदतीची जोरदार घोषणाबाजीही केली. पण त्या मदतीचा पैसा वर्षानंतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नव्हता, हे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातच स्पष्ट झाले. मदत का मिळाली नाही याची माहिती घेतो, असे बोलघेवडे आश्वासन देऊन मुख्यमंत्री ठाकरे मुंबईत परतले, पण मंत्रालयाकडे मात्र फिरकलेच नाहीत. त्यामुळे मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यास न्याय मिळालाच नाही. सेलिब्रिटींच्या बचावासाठी सरकारमधील मंत्र्यांची कारकिर्द पणाला लावून त्यांच्यासाठी कामे बाजूला ठेवून किल्ला लढविणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांचा आक्रोश दिसत नाही का? असा सवालही उपाध्ये यांनी केला. १३ ऑक्टोबरला ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींच्या मदतीचा गाजावाजा केला. अजूनही त्यापैकी एक पैसाही शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेला नाही. केवळ संकटग्रस्त भागांचे दौरे करणे आणि मदतीच्या घोषणा करणे यात काही अर्थ नाही असे खुद्द मुख्यमंत्रीच म्हणाले होते. त्यांना आपल्या या वाक्याची आठवण असेल व थोडीशी जरी लाज असेल, तर त्यांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या मदतीमधून किती शेतकऱ्यांना लाभ झाला, कोणाकडे पैसा पोहोचला, याचा संपूर्ण राज्याचा तपशील जनतेसमोर उघड करावा.” असे आव्हान उपाध्ये यांनी दिले.

याचबरोबर, “महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यांपासून महिलांवर बलात्कार, अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. महिलांना न्याय देण्यासाठी सरकारने वेळोवेळी केलेल्या घोषणांचे काय झाले? कोणत्या उपाययोजना अमलात आल्या आणि किती गुन्हेगारांना कोणत्या शिक्षा झाल्या? हेदेखील जाहीर करण्याची हिंमत ठाकरे सरकारने दाखवावी.” असे देखील उपाध्ये म्हणाले. “गेल्या दोन वर्षांत खंडणी वसुली आणि टक्केवारीपलीकडे जनहिताची कोणतीही योजना न आखणाऱ्या निष्क्रिय सरकारच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून आंदोलन करणारे कार्यकर्ते जागोजागी सरकारला जाब विचारतील, व काळ्या कारभाराचे वाभाडे काढून जनतेसमोर सरकारचे स्वार्थी रूप उघड करतील.” असेही उपाध्ये यांनी नमूद केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button