breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमनोरंजनमुंबईराजकारण

एक वादग्रस्त पोस्ट आणि १३ गुन्हे; केतकी चितळेभोवती कारवाईचा फास आणखी घट्ट होणार!

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंबंधी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. राज्यात ठिकठिकाणी तिच्याविरूद्ध गुन्हे दाखल केले जात आहे. आता नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातही तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केतकी चितळेविरोधात दाखल झालेला हा राज्यातील तेरावा गुन्हा आहे.

पारनेर पोलीस ठाण्यात सामाजिक कार्यकर्ते, शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव बबनराव भोर (रा. देसवडे ता.पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चितळेविरूद्ध कलम १५३ सह बदनामी केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

या फिर्यादीत भोर यांनी म्हटलं आहे की, आपण सामाजिक कार्यकर्ता असून वारकरी सांप्रदायातील अनुयायी आहे. १४ मे रोजी केतकी चितळे हिने फेसबुकवर टाकलेली एक पोस्ट वाचण्यात आली. त्यामध्ये एका कवितेच्या माध्यमातून अॅड. नितीन भावे यांनी ती लिहिली आहे असे दाखवून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबतीत आक्षेपार्ह विधाने करण्यात आली आहेत. चितळे हिची ही पोस्ट जवळपास दहा ते बारा इतर लोकांनी शेअर करून तिला प्रसिद्धी दिली असल्याचं निदर्शनास आलं आहे. तसंच विविध प्रसार माध्यमांतूनही ती दाखविली जात आहे. चितळे, अॅड. नितीन भावे व ज्यांनी ज्यांनी ही पोस्ट केतकी चितळे हिच्या फेसबुक अकाउंटवरून शेअर केली या सर्वांनी संगनमत करून मराठा व ब्राम्हण समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशानेच सदरची पोस्ट तयार करून सोशल मीडियामध्ये टाकून जातीय तेढ निर्माण केलेली आहे. याशियाव संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा गैरवापर करून माझ्यासह समस्त वारकरी संप्रदायाच्या अनुयायांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. सदरील आरोपी केतकी चितळे ही एक अभिनेत्री असून त्या माध्यमातून मिळालेल्या प्रसिद्धीचा वापर यापूर्वी तिने छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करून सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह व वादग्रस्त पोस्ट केली होती. त्याप्रमाणेच नवबौद्ध धर्माच्या व्यक्तींना सुद्धा ते फुकटात मुंबई येथे चैत्यभूमीच्या दर्शनाला येतात असेही द्वेषमूलक, आक्षेपार्ह पोस्ट केली होती. यावरून केतकी चितळे ही एक सराईत सायबर गुन्हेगार आहे व ती व तिचे साथीदार विचारपूर्वक, जाणीवपूर्वक ब्राह्मणेतर समाजाच्या भावना दुखावण्याच्या हेतूने ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांच्यामध्ये सातत्याने जातीय व धार्मिक वाद निर्माण करत आहे. त्यामुळे या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी फिर्यादित करण्यात आली आहे.

पारनेर पोलिसांनी याची दखल घेऊन चितळेविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता चितळे हिला ठाण्याच्या गुन्ह्यात जामीन मिळण्यापूर्वीच पारनेरच्या गुन्ह्यात अटक करून आणावी, अशी मागणीही भोर यांनी केली आहे. यासंबंधी भोर यांनी म्हटलं आहे की, ‘जगतगुरू तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व इतर बहुजन महामानव, तसेच मराठा बहुजन समाज आणि या समाजातील सामाजिक, राजकीय नेतृत्व यांना तुच्छ लेखणे, त्यांचा सातत्याने द्वेष करणारा एक वर्ग महाराष्ट्रात व देशात शेकडो वर्षांपासून अस्तित्वात आहे. हा वर्ग स्वतः ला उच्चवर्णीय समजतो. केतकी चितळे, नितीन भावे हे या विकृत विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात. शरद पवारांसारख्या एखाद्या जनमान्य नेतृत्वाच्या मृत्यूची आस बाळगणे, त्यांनी जीवघेण्या गंभीर आजारावर केलेली मात हे खरे तर अनेकांना प्रेरणादायी आहे, मात्र हे नाकारून त्यावर व्यंग करणे यापेक्षा नीचपणा दुसरा नाही. स्वत:ला श्रेष्ठ, उच्चवर्णीय म्हणवणारी माणसे विचाराने किती खुजी असतात हे केतकी चितळे, अॅड. नितीन भावे व त्यांच्या भाईबंदाच्या कृतीतून दिसते.’

दरम्यान, केतकीविरूद्ध आतापर्यंत १२ गुन्हे दाखल झाले आहेत. ठाणे, अकोला, पवई-मुंबई, गोरेगाव-मुंबई, अमरावती, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, सातारा याठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button