गांजा विक्री प्रकरणी एकास अटक : दोन किलो गांजा जप्त
पिंपरी l प्रतिनिधी
गांजा विक्री करणा-या एका तरुणाला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून दोन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे ही कारवाई मंगळवारी (दि. 15) दुपारी साडेतीन वाजता काळभोर गोठा, ओटास्कीम निगडी येथे करण्यात आली.
तेजस रघुनाथ धनकवडे (वय 25, रा. ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह सागर मुकुंद गायकवाड (वय 30, रा. ओटास्कीम, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक प्रसाद कलाटे यांनी मंगळवारी (दि. 15) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळभोर गोठा, ओटास्कीम निगडी येथे आरोपी तेजस याने गांजा विक्रीसाठी आणला असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन कारवाई करत तेजस याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 52 हजार 625 रुपये किमतीचा दोन किलो 025 ग्राम गांजा जप्त केला. हा गांजा तेजस याने सागर याच्या सांगण्यावरून विक्रीसाठी आणला असल्याचे तपासात समोर आल्याने सागर याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.