breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवडराजकारणलेखसंपादकीय

पिंपरी-चिंचवडमध्ये आता ‘रामराज्य’ : शिंदे-फडणवीस सरकारची आमदार लांडगेंना ताकद!

पिंपरी-चिंचवडचे एकमूखी नेतृत्व करण्याची संधी

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांचे राजकीय वजन वाढले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लांडगेंनामोठी राजकीय ‘ताकद’ दिली असून, शहराचे एकमूखी नेतृत्व करण्याची संधी लांडगे यांना चालून आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापनेपासून सुरूवातील काँग्रेस, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एकहाती सत्ता गाजवली. दिवंगत खासदार अण्णासाहेब मगर, मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांनी शहराचे नेतृत्व केले. त्यानंतरच्या काळात राष्ट्रवादीचे ‘कारभारी’ अजित पवार यांच्याकडे शहराची धुरा आली.

२००२ पासून सलग १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पिंपरी-चिंचवड महापालिकेत निर्विवाद सत्ता राहीली. २०१४ मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीविरोधात स्थानिक नेतृत्वाच्या मुद्यावर बंड केले. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीच्या पराभवाची खरी सुरवात झाली.

दरम्यान २०१४ मध्येच भोसरी विधानसभेतील तत्कालीन अपक्ष उमेदवार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार विलास लांडे यांचा पराभव केला. पुढे २०१७ च्या महापालिका निवडणुकीपूर्वी आमदार लांडगे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केला.

२०१७ मध्ये झालेल्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत ‘नको बारामती…नको भानामती… पिंपरी-चिंचवडची धुरा देवू ‘राम-लक्ष्मणाच्या हाती’’ ही निवडणूक प्रचार घोषणा प्रचंड गाजली होती. पिंपरी-चिंचवडकरांनी भाजपा आणि राम-लक्ष्मण जोडीला अर्थात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांना शहराचे नेतृत्व करण्याची संधी दिली.

२०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. त्यावेळी शिवसेनेने भाजपाची काडीमोड घेतला आणि राष्ट्रवादी-काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे जगताप आणि लांडगे यांना विरोधी बाकावर बसावे लागले. दुर्दैवाने जगताप यांना आजाराने घेरले. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. मात्र, जगताप यांनी भाजपासोबत असलेली निष्ठा कायम ठेवली. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत जोखीम पत्करुन जगताप यांनी मतदान केले. दि. ३ जानेवारी २०२३ रोजी जगताप यांचे निधन झाले. स्थानिक पातळीवर भाजपाचा ‘किंगमेकर’ नेता हरपला.

दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक लागली. भाजपा शहराध्यक्ष या नात्याने आमदार लांडगे यांच्यावर ‘बिनविरोधची जबाबदारी’ देण्यात आली.  त्यामुळे भाजपाच्या स्थानिक निर्णय प्रक्रियेत आमदार लांडगे यांचा रोल महत्त्वाचा ठरताना दिसत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेत यावर अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब झाले.

***

प्रखर हिंदूत्व आमदार लांडगेंची ‘लाईन ऑफ ॲक्शन’

आमदार लांडगे यांच्या संकल्पनेतून भोसरीत महाराष्ट्रातील सर्वात मोठी इंद्रायणी थडी भरवण्यात आली. त्याचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते झाले. तर समारोप राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते झाला. राज्यातील राजकीय, अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी या महोत्सवाला हजेरी लावली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी लांडगे यांच्या कार्याचे तोंडभरुन कौतूक केले.  अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती उभारून लांडगेंनी आपल्या राजकीय वाटचालीची ‘लाईन ऑफ ॲक्शन’ निश्चित केली आहे. शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजी भिडे, हिंदू राष्ट्र सेनेने संस्थापक धनंजय देसाई, प्रखर हिंदूत्ववादी अध्यात्मिक गुरू कालिचरण महाराज, विश्व हिंदू परिषदेचे भारतीय सत्संग प्रमुख दादा वेदक, क्षेत्रप्रचारक अण्णा पंडित, गोरक्षक स्वामी शिवशंकर महाराज यांची उपस्थिती ही बाब अधोरेखित करते. प्रखर हिंदूत्ववादी भूमिका आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकाची ताकद यामुळे आमदार महेश लांडगे यांना शहराचे नेतृत्व करण्याची संधी आता चालून आली आहे. त्यामुळे राम-लक्ष्मण जोडी फुटली असली, तरी ‘रामराज्य’ प्रस्तापित करण्यासाठी आमदार लांडगेंच्या नेतृत्वाला संधी मिळणार, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button