breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“आता मी सुरुवात करेन; भाजपाशी संबंधित १०० नावं अशी देईन…”, संजय राऊतांचा इशारा!

मुंबई |

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेमध्ये तब्बल ५०० ते ७०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणारं पत्र भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पाठवलं होतं. यासंदर्भातली पुराव्यांची फाईलच आपण किरीट सोमय्यांना पाठवल्याचं संजय राऊत म्हणाले. मात्र, आता भाजपाशी संबंधित अशी १०० नावं देणार असल्याचा इशारा राऊतांनी दिला आहे. ही सुरुवात असून अजून ९९ नावं मी देईन, माझं काय वाकडं करायचंय ते करा, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपाला इशारा दिला आहे. तसेच, पुराव्यांची फाईल तुम्हाला पाठवली आहे, आता हा घोटाळा उघड करा, असं आव्हान देखील राऊतांनी किरीट सोमय्यांना दिलं आहे.

  • “भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे शिरोमणी..किरीट सोमय्या!”

“पिंपरी चिंचवडमध्ये ७०० कोटींचा घोटाळा दिसतोय. स्मार्ट सिटी हा केंद्राचा प्रकल्प आहे. देशभरात या प्रकल्पात जे घोटाळे सुरू आहेत, त्यातला एक शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांनी समोर आणला आहे. पण कुणी दखल घ्यायला तयार नाही. तुम्ही महाविकासआघाडीच्या ५० लाख, १० लाखांवर चौकशी करत आहेत. कायदेशीर व्यवहारांचीही चौकशी केली जात आहे. किरीट सोमय्या हे सगळं करत आहेत. पंतप्रधान म्हणतात जनतेचा पैसा लुटणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. मग हा देखील जनतेचाच पैसा आहे. ती सगळी फाईल आम्ही भ्रष्टाचार विरोधी लढ्याचे शिरोमणी असलेल्या किरीट सोमय्यांना पाठवली आहे. आता त्यांनी हा घोटाळा बाहेर काढावा आणि संबंधितांना तुरुंगात पाठवावं”, असं राऊत म्हणाले.

“मी घोषणा केली होती की भाजपासंदर्भातली १०० नावं मी अशी देईन ज्यांच्यावर ईडी आणि सीबीआयनं कारवाई करायला हवी. हे त्यातलं पहिलं नाव आहे. अजून ९९ नावं पुराव्यांसह देणार मी. हे त्या १०० जणांच्या यादीतलं १००वं नाव आहे. आता मी सुरुवात करेन. मला बघायचंय की कारवाई होणार की नाही. यात सगळे प्रमुख लोक आहेत. सगळे भ्रष्टाचाराच्या गंगेत डुबक्या मारत आहेत हे सगळं माझ्याकडे आहे. मी ते देणार”, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.

संजय राऊतांनी बुधवारी किरीट सोमय्या यांना एक पत्रच पाठवलं आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये ५०० ते ७०० कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत हा घोटाळा झाला, ईडी, सीबीआय चौकशीसाठी सोमय्यांनी पुढाकार घ्यावा. असं संजय राऊत यांनी पत्राद्वारे आवाहन केलं आहे. तसेच, पत्रातील माहितीच्या आधारे सोमय्या ईडीकडे घोटाळ्याच्या चौकशीसाठी पाठपुरवा करतील, अशी अपेक्षा देखील संजय राऊत यांनी व्यक्त केलेली आहे. संजय राऊत आपल्या पत्रात म्हणतात, सर्वच ठिकाणचे घोटोळे उघड करणारे व्यक्ती म्हणून तुम्ही तुमची ओळख निर्माण केली आहे. मागील अनेक वर्षांपासून तुम्ही हे करत आहात. सरकारी पैसा आणि मालमत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना शोधून काढण्यासाठी तुम्ही कष्ट घेतले. खरं तर, अनेक सरकारी कर्मचारी आणि राजकीय नेत्यांना तुम्ही त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरण उघड केल्यानंतर तुरुंगात जावं लागलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button