breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडलेख

कोरोना संकटात उपदेशाचे डोस नको, वस्तुस्थिती मान्य करायला हवी!

लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आरोग्य यंत्रणा कमी पडतेय

महामारी भयंकर, केवळ इच्छाशक्ती असून फायदा नाही

पिंपरी । अधिक दिवे
कोरोनाची दुसरी लाट म्हणजे मानवजातीसाठी महाभयंकर काळ आहे. प्रशासकीय व्यवस्था, लोकप्रतिनिधी सर्वांनीच आपली सर्वशक्ती पणाला लावून लोकांचे जीव वाचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. मात्र, या अतितटीच्या काळात काहीजण ‘राजकीय’ द्वेष पेटवण्याचा प्रयत्न करीत आहेत, ही परिस्थिती केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाबाबतही दिसते.
पिंपरी-चिंचवड शहरात दिवसागणिक २ ते अडीच हजार नागरिक कोरोना बाधित होत आहेत. आजवर सुमारे १ लाख ९० हजार पिंपरी-चिंचवडकर कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यापैकी अडीच हजारपेक्षा जास्त लोकांनी जीव मगावला आहे. विशेष म्हणजे, आजच्या दिवशी १८ हजार हून अधिक रुग्ण कोरोनी प्रत्यक्ष झूंज देत आहेत.
त्यामुळे प्रशासन कमी पडले, लोकप्रतिनिधी कमी पडले, सरकार उदासीन आहे, असे एक ना अनेक सवाल कथित विचारवंतांनी समाजमाध्यमांमधून माडायला सुरूवात केली. वास्तविक, नकारात्मक मांडणी करीत हेच लोक खऱ्या अर्थाने व्यवस्था आणि व्यवस्थेत काम करणाऱ्यांचे मनोबल खच्ची करीत आहेत, याची चिंता वाटते.
मेडिकल इंफ्रास्ट्रक्चर एका दिवसात उभा राहते काय?
आता प्रश्न आहे की, सुमारे २० हजार रुग्णांना आवश्यक असलेले ‘ ‘मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर’ आपल्याकडे आहे का? अनेकांनी आक्षेप आहे की, सोयी-सुविधा मिळत नाहीत. पण, पिंपरी-चिंचवडचा ‘रिकव्हरी रेट’ पाहिला, तर पुणे जिल्ह्यातच काय राज्यात आपण आघाडीवर आहोत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत २५ लाख पिंपरी-चिंचवडकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न झाले, हे वास्तव आहे. आता नव्याने (दुसरी लाट) २० हजार रुग्णांना एकाचवेळी उपचार द्यायचे म्हणजे आरोग्य व्यवस्थेवर ताण येणे क्रमप्राप्त आहे. पण, आपण वस्तुस्थिती स्वीकारात नाही, हीच आपली कमजोरी आहे.
मुख्यमंत्र्यांनी असाह्यता मान्य केली…
सध्यस्थितीला व्हेंटिलेटर बेड, प्लाझ्मा, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड आणि सर्वात महत्त्वाचे आरोग्य व्यवस्थेसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ आता राज्याचे मुख्यमंत्री लोकांना याच गोष्टी मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून एक-दोन महिन्यात उभा करण्यासारख्या नाहीत, असे वारंवार सांगत आहेत. तिच परिस्थिती पिंपरी-चिंचवडमध्ये आहेत. राज्यात लावलेले कडक निर्बंध आणि लॉकडाउन हा त्याचाच प्रत्यय आहे. ‘मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर’बाबत असलेली मुख्यमंत्री आणि राज्यकर्त्यांची वास्तविक हतबलता आपण का स्वीकारत नाही? असा प्रश्न आहे.
पालकमंत्र्यांनीही हात टेकले…
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दुसऱ्या लाटेच्या सुरूवातील राज्यात लॉकडाउनला विरोध केला होता. राष्ट्रवादीसह काँग्रेसच्या नेत्यांचीही तोच सूर होता. मात्र, नंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. पालकमंत्री प्रत्येक आठवड्याला पुण्यात लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतात, आढावा घेतात. सुरूवातीला काही निर्बंध लावण्यात आले. त्यानंतर काही निर्बंध कठोर करण्यात आले. आता पालकमंत्र्यांनी ७ ते ११ अत्यावश्यक सुविधा खुल्या राहतील, असा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, ‘‘स्वत: अजित पवारने फोन केला तरी बेड उपलब्ध होणार नाही, ’’ अशी हतबलता जाहीरपणे बोलून दाखवली होती. पालकमंत्र्यांनी वस्तुस्थिती मान्य करीत वेळोवेळी आवश्यक निर्णय घेतले. यापुढे शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी जिल्हा प्रशासन कोविड परिस्थिती हाताळण्यात कमी पडत आहे, असा संताप व्यक्त करीत आंदोलनाची भूमिका घेतली होती, या सर्व गोष्टींचा विचार करता सर्वच स्तरातून हतबलता अप्रत्यक्षपणे मान्य केलेली दिसते.
पिंपरी-चिंचवडमधील संकुचित प्रवृत्ती…
शहरात कोरोनाची महामारी सुरू आहे. मात्र, ‘बड्या-बड्या बाता अन् ढुंगण खातयं लाथा’ असे चित्र पहायला मिळत आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकेच राजकारणी नेते लोकांच्या मदतीला धावून जात आहेत. बाकी ‘पोपट पंच्छी’ करणारे काठावर बसून आहेत. आरोग्य व्यवस्था, आरोग्य कर्मचारी, लोकप्रतिनिधी सर्वच या महामारीसमोर अक्षरश: गुढघ्यावर आले आहेत, ही वस्तुस्थिती जोपर्यंत आपण मान्य करीत नाही, तोपर्यंत नागरिक या लढाईत स्वत:चे योगदान देणार नाहीत. अन्यथा ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही संकल्पना पुढे आलीच नसती. एखाद्या युद्धाचे परिणाम, वस्तुस्थिती न सांगता खोटा आत्मविश्वास देण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा आपण संकटात आहोत. काळजी घेतली पाहिजे, अशी साद घातली पाहिजे का नको? याचा उपदेश पंडितांनी आणि त्याचा आधार घेत राजकीय संधीसाधुपणा करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी विचार केला पाहिजे.

वरिल सर्व बाबींचा विचार करता, शहरातील उपदेश पंडित आणि राजकीय संधीसाधुपणा करणाऱ्या नेत्यांनी शहरातील आरोग्य व्यवस्था, प्रामाणिक काम करणारे लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे यांच्या मानसिकतेचा विचार करावा. २० हजारहून अधिक रुग्णांना उपचार देताना लागणारे ऑक्सिजन बेड, रेमडेसिवीर इंजेक्शन, व्हँटिलेटर बेड आपल्याकडे आहेत का?, या सुविधा निर्धारित वेळत केवळ कोट्यवधी रुपये मोजून खरेदी करता येतात का? याचे चिंतन करावे. विषेशत: उपदेश पंडितांनी समाजमाध्यम, प्रसारमाध्यमांमध्ये व्यक्त होण्यापूर्वी दोन-चार रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन अथवा बेड उपलब्ध करुन द्यावेत, या सुविधांसाठी आपला संपर्क क्रमांक जाहीर करावा, मग वस्तुस्थितीचा अंदाज येईल, तुर्तास हीच आपली सामाजिक बांधिलकी ठेवावी, अन्यथा लोकांची दिशाभूल केल्याचे पातक आपल्या माथी आयुष्यभर राहील, यात तिळमात्र शंका नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button