आरोग्य मंत्रालयाकडून नव्या गाईडलाइन्स; लहान मुलांना रेमडेसिविर न देण्याच्या सूचना
नवी दिल्ली – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून उपचारासाठी मार्गदर्शक तत्त्व प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यात स्पष्ट करण्यात आले आहे की, कोरोनाबाधित मुलांना अँटी व्हायरल रेमडेसिवीर इंजेक्शन देऊ नये. त्याचसोबत असेही सांगण्यात आले आहे की, कोरोनाबाधित मुलांवर उपचार करताना त्यांना स्टिरॉइड देणे टाळा. त्याचबरोबर या गाईडलाइन्समध्ये लहान मुलांची शारीरिक क्षमता तपासण्यासाठी 6 मिनिटांची वॉक टेस्ट घेण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या मुलांना अस्थमा आहे. त्यांच्यासाठी या वॉक टेस्टचा सल्ला देण्यात आलेला नाही, गाईडलाइन्समध्ये उल्लेख करण्यात आल्यानुसार, जर एखाद्या रुग्णास कोरोनाची तीव्र लक्षणे आढळून आली तर अजिबात उशीर न करता ऑक्सिजन थेरपी सुरू केली जावी.
तसेच आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, गंभीर रुग्णांना स्टिरॉइड देण्यात यावे. मंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या गाईडलाइन्समध्ये, लहान मुलांच्या हाताच्या बोटाला ऑक्सिमीटर लावून त्यांना 6 मिनिटांसाठी फिरण्यास सांगावे. जर यादरम्यान, त्यांचे सॅच्युरेशन 94 हून कमी आले, तर त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे निष्पन्न होईल. या आधारावर मुलांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.