breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ‘गुगली’; भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांची ‘विकेट’?

  • मुरब्बी शरद पवारांकडून जाहीरपणे शहर कार्यकारिणीची पाठराखण
  • माजी नगरसेवकांच्या मदतीने कार्यकारणीच्या बदनामीचा घाट उधळला

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विद्यमान कार्यकारिणी अत्यंत असक्षम असून, आता ‘सक्षम शिलेदार’ असला पाहिजे, असा सूर आजी-माजी नगरसेवकांच्या बैठकीत हेतुपुरस्सर पेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. पक्षांतर्गंत गटबाजी आणि अति महत्वाकांक्षी स्थानिक नेत्यांचा डाव लक्षात आल्यानंतर मुरब्बी पवारांनी कार्यकारिणीची पाठराखण केली. विशेष म्हणजे, पक्ष कसा चालवायचा… हे आम्ही चांगले जाणतो…, अशी पुष्टीही जाहिरपणे दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टाकलेल्या ‘गुगली’मुळे माजी आमदार विलास लांडे यांची ‘विकेट’  पडली आहे, अशी चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात रंगली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विद्यमान कार्यकारिणी आणि शहराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे. सलग दोनदा शहराध्यक्ष असलेल्या संजोग वाघेरे-पाटील यांची हकालपट्टी व्हावी आणि शहराध्यक्षपदी आपली वर्णी लागावी, यासाठी माजी आमदार विलास लांडे निकराचे प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी पक्षांतर्गत उठाव करण्यात येत आहे, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात माजी नगरसेवकांची बैठक यमुनानगर येथील बँक्वेट हॉलमध्ये शनिवारी पार पडली. यावेळी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, प्रसाद शेट्टी, माजी नगरसेविका शमिम पठाण, शकुंतला धराडे, पंडित गवळी, किरण मोटे, तानाजी खाडे आदी उपस्थित होते. उपस्थित नगरसेवकांनी आपआपली मते पवार यांच्यासमोर मांडली.

वास्तविक, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील दौऱ्यादरम्यान तिकीटवाटपाबाबत दिलेल्या संकेतांमुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. अजित पवार म्हणाले होते की, ‘‘ भाजपाच्या लाटेत अनेकांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पण, अनेकजण आता परत पक्षात येणार आहेत. कोणी पक्षात किती वर्षे काम केले. यापेक्षा निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच तिकीटवाटपात प्राधान्य दिले जाणार आहे.’’ त्यामुळे अनेकांची अडचण झाली आहे. आता शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ३० टक्के तिकीटांच्या जागा माजी नगरसेवकांसाठी राखीव ठेवाव्यात, अशी आग्रही मागणी करण्यात आली. मात्र, एकोप्याने पक्षाची कामे करा, योग्य उमेदवाराला न्याय देण्यात येईल, असा सल्ला देत पवारांनी त्याकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे.

… हे काय वाघेरे-पाटलांच्या घरच लग्न आहे का?

दरम्यान, माजी नगरसेवकांपैकी काहींनी शहर कार्यकारिणीवर तोंडसुख घेतले. कार्यकारिणीमध्ये कोणतीही सुसूत्रता नाही. शहराध्यक्ष हे कायम गोंधळलेले असतात. पक्षात कोणतेही योग्य नियोजन नसते. आम्हाला कोणत्याही कार्यक्रमात बोलवत नाही. पक्षवाढ न होता पक्षाचे नुकसान होत आहे. अशा नियोजनबद्ध तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. मात्र, पक्षांतर्गंत कार्यक्रमांचा संदेश सर्व कार्यकारिणी आपआपल्या संपर्कक्रमांवर पोहोचवत असतात, असा दावा प्रवक्ते फझल शेख यांनी केला आहे.  माजी नगरसेवकांनी कार्यक्रमांना हजेरी लावली पाहिजे. पक्षाचे माजी नगरसेवक म्हणून त्यांची जबाबदारी नाही का? शहर राष्ट्रवादीत अनेक ‘मानाचे गणपती’ आहेत. मग,  बोलावलं तरच येणार… हे काय वाघेरे-पाटलांच्या घरचं लग्न आहे का? असा प्रश्न राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

शरद पवारांनी अक्षरश: कान टोचले…

माजी नगरसेवकांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर शरद पवार म्हणाले की, आपण सर्वांनी एकत्र काम करावे, पक्षाचे विचार, ध्येय-धोरणे प्रत्येकांने सामान्य माणसापर्यंत पोहोचवावे, सगळ्यांना आपआपले काम पाहून योग्य ठिकाणी संधी देण्यात येईल. मागील आपल्या काळात पिंपरी-चिंचवड शहराचा चेहरा-मोहरा बदलला. पण भाजपच्या काळात खूपच चुकीची कामे सुरु आहेत. एकाने अर्धा भाग आणि दुस-याने अर्धा भाग घेतला आहे. ही तुझी आणि ही माजी बाजू अशी शहराची वाटणी केली. यामुळे शहरात विकासाचा कोणताही धोरणात्मक कार्यक्रम दिसत नाही. हे सर्व लोकांच्या समोर गेलं पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी योग्य नियोजन करुन महापालिका पुन्हा आपल्याच ताब्यात घेण्यासाठी तयारी लागा,  अशा शब्दांत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button