breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची जनजागर यात्रा ‘फसली’

महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी अनुपस्थिती

शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे संघटनात्मक अपयश

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
देशात वाढती बेरोजगारी आणि महागाईविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुढाकाराने राज्यात केंद्र सरकार आणि भारतीय जनता पार्टीविरोधात रान पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या यात्रेचे बुधवारी पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले. मात्र, या ‘जनजागर यात्रे’कडे महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह पाठ फिरवली.

महिला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांच्या पुढाकाराने प्रदेशस्तरावर नियोजित केलेली ‘जनजागर यात्रा’ पिंपरी-चिंचवड शहरात काल दाखल झाली. ‘सावित्रींच्या लेकींचा जनजागर’ असा संदेश देण्याचा यामाध्यमातून प्रयत्न करण्यात आला. मात्र, या यात्रेचे नियोजन पूर्णपणे फसलेले पहायला मिळाले. या यात्रेत शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, प्रदेश युवक आघाडीचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांच्यासह पुरूष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भरणा होता. वास्तविक, महिला कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक हेतूने ही यात्रा आयोजित केली असून, प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण मार्गदर्शन केले. पिंपरीत यात्रेचे आगमन झाले आणि भोसरीतील पीएमटी चौकात यात्रेचा समारोप करण्यात आला.

वास्तविक, राज्यातील राजकीय पक्षांच्या संघटनात्मक घडामोडींचे निरीक्षण केले असता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या माध्यमातून प्रबोधन यात्रा सुरू आहे. भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचा दौरा सुरू आहे. याच धर्तीवर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माध्यमातून ‘जनजागर यात्रा’ प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी, भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पिंपरी-चिंचवडचा दौरा केला. शहर महिला मोर्चाचा मेळावा झाला. त्यावेळी संघटनात्मक बांधणी, मेळावा आणि त्यानंतर पत्रकार परिषद असे यशस्वी नियोजन करुन भाजपा महिला शक्ती सक्षम असल्याचा संदेश देण्यात आला.

याउलट, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी आणि स्वत: शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी प्रयत्न करुनसुद्धा ‘जनजागर यात्रा’ प्रभावीपणे आयोजित करता आली नाही. यात्रेसंदर्भात प्रसारमाध्यमांशी समन्वय करणे अपेक्षीत होते. यात्रेमागचा हेतू आणि नियोजन पिंपरी-चिंचवडकरांपर्यंत पोहोचणे अपेक्षीत होते. मात्र, तसे न करता केवळ नियोजनाचे सोपस्कार पार पाडण्यात आले. शहर राष्ट्रवादी महिला आघाडीकडे सुमारे ४५० पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी असल्याचे शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांनी अनेकदा सभा-संमेलनामध्ये स्पष्ट केले आहे. त्यामुळे किमान ३०० महिला या जनजागर यात्रेत सहभागी होणे अपेक्षीत होते, अशी खंत राष्ट्रवादीतील निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

अजित पवार यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष

गेल्या महिन्यात राष्ट्रवादीतील राज्यस्तरीय दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत ‘विचार प्रबोधन’ कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार स्वत: उपस्थित होते. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेल्या प्रबोधन शिबिराला महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संख्या अगदी नगण्य होती. याकडे लक्ष वेधत अजित पवार यांनी महिला शहराध्यक्ष प्रा. कविता आल्हाट यांच्यासह शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांना सूचना केल्या होत्या. महिला कार्यकर्ते, कार्यकारिणीतील सदस्यांची संख्या कार्यक्रमात दिसली पाहिजे, असे सूचवले होते. मात्र, या सूचनेकडे शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button