breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी –चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा; शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती

पिंपरी –आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 17) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी – चिंचवड शहर (जिल्हा) कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला.

मेळाव्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, वैशाली काळभोर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर मंगला कदम, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, प्रशांत शितोळे, जगदीश शेट्टी, प्रवक्ते फजल शेख आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. त्यासाठीची आचारसंहिता डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लागू शकते. त्यामुळे निवडणुकीला केवळ अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी राहिला आहे. महापालिकेची निवडणूक तीन सदस्यीय पद्धतीने होणार आहे. प्रभाग रचनेच्या कच्चा प्रारुप आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपल्याने राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजोग वाघेरे यांनी केले. प्रास्ताविकेच्या वेळी वाघेरे म्हणाले, प्रकृती अस्वास्थ्य असतानाही पवार साहेब नागरिकांचे, शेतकऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करत आहेत आणि या बाबत आढावा म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील विविध प्रश्नांवर शनिवारी सुमारे सहा तास याबाबत पवार साहेबांनी चर्चा केली.

विरोधकांवर ताशेरे ओढत वाघेरे म्हणाले, पूर्वी एक रुपयाने जरी इंधन दरवाढ झाली तरी रस्त्यावर येऊन भाजपवाले आंदोलन करायचे. आता तर पेट्रोल, डिझेल शंभरीपार गेले आहे; मात्र तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि अन्य केंद्रीय मंत्री इंधन दरवाढ, शेतकरी आंदोलन, कायदे याबाबत बोलत नाहीत.

दरम्यान, महापालिकेच्या भ्रष्टाचारी व्यवस्थेचा समाचार घेत वाघेरे पुढे म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. भाजपच्या स्थायी समिती अध्यक्षाला लाच घेतल्याप्रकरणी अटक झाली, परंतु भाजपने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. शास्तीकर आणि अन्य बाबतीत भाजपने केवळ आश्वासने दिली. पवार साहेबांच्या येण्याने आम्हा कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे. आगामी महापालिका निवडणुकीत याचा चांगला परिणाम दिसेल, असे म्हणत संजय वाघेरे यांनी कार्यकर्यांना शाब्दिक बळ दिले.

तर, कार्यक्रमप्रसंगी माजी आमदार विलास लांडे म्हणाले, पवार साहेबांना भेटण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची आम्ही चौकशी करण्यापूर्वी त्यांनी शहराबद्दल चौकशी केली. त्यांना पिंपरी चिंचवड शहराबद्दल एवढी आत्मीयता आहे. तरुणांना लाजवेल असे काम त्यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड शहरात आयटी, उद्योग क्षेत्र आणण्यासाठी पवार साहेबांनी काम केले आहे. आपलीच काही जित्राबं दुसरीकडे गेली. ज्यांची लायकी नाही त्यांना मोठं केलं असे म्हणत लांडे यांनी खेद व्यक्त केला तसेच शहरातील जनता भाजपच्या कारभाराला कंटाळली असल्याचे सुद्धा पुढे म्हणाले.

आजचा कार्यकर्ता मेळावा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नसून शेतकरी कायदे, शेतकरी आंदोलन, लखीमपूर येथील दुर्दैवी घटना अशा विविध मुद्द्यांवर भाष्य करण्यासाठी हा मेळावा असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले. देशातील अन्यायकारी वागणूकीवर उत्तरादाखल कोल्हे म्हणाले, इंधन दरवाढ, शेतकरी आंदोलन यावर सध्या केंद्राचे ‘मौनुम खलम सर्वार्थ साधनम’ असे धोरण आहे पण या विरोधात 80 वर्षांचा तरुण मैदानात उतरला आहे.

वाढच्या इंधन दरवाढीचा समाचार घेताना कोल्हे म्हणाले, मोफत लस देण्यासाठी इंधन दरवाढ केली जात असल्याचे केंद्र सरकार उत्तर देत आहे. प्रत्येक खरेदीवर सर्वसामान्य नागरिक चार टक्के कर देतो. त्यातून हजारो कोटींचा निधी जमला आहे. तरीही केवळ लसीसाठी इंधन दरवाढ केली जात आहे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे.

शहरातील सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारावर टीका करताना कोल्हे पुढे म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराचा पुढील 75 वर्षांचा विचार करून नियोजन केले आहे. 2017 पूर्वी पिंपरी – चिंचवडची ओळख प्रगतीबाबत होत होती. पिंपरी चिंचवड शहरात संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक स्थायिक झाले आहेतस त्यामुळे त्यांना शहरात चांगले वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. महापालिकेत भाजपने केलेली भ्रष्टाचारमुक्त केवळ 10 कामे दाखवा, पुन्हा शहरात येणार नाही, त्यामुळे या शहरात राहून आपली स्वप्नं साकार करणाऱ्यांसाठी ही कामे सांगा, असे आवाहन कोल्हे यांनी केले. 2017 च्या निवडणुकीत भाजपने लोकांच्या हाती केवळ गाजर दिले, असेही कोल्हे म्हणाले.

दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधात बसायचं ठरलं होतं. पण शरद पवार साहेबांनी समीकरणे जुळवून आणली आणि महाविकास आघाडीचे सरकार बनवले. अडीच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदी यांनी जनतेला स्वप्न दाखवलं होतं. पण आज केंद्र सरकर शेतकरी कामगारांच्या विरोधात काम करत आहे.

विरोधकांना धारेवर धरत पाटील म्हणाले, नैसर्गिक आपत्ती, कोरोना काळात हात आखडता घेऊन भूल भुलैय्या करायचे काम चालू आहे. महागाई वरील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी काहीतरी कारण काढून विरोधी पक्षाला नामोहराम करण्याचे काम सुरू आहे.

शहराबद्दल बोलताना गृहमंत्री म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरात मागील महापालिका निवडणुकीपूर्वी इथल्या जनतेला आश्वासने दिली. त्यापूर्वी पिंपरी चिंचवड शहरात पिण्याचे पाणी, कचरा प्रश्न, टाऊन प्लॅनिंग, वाहतूक कोंडी हे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसने काही अंशी सोडवले, पण पुढील काळात आपल्याला आणखी जास्त काम करायचं आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा घेतला जात आहे का, असे विचारले जाते. पण ताकाला जाऊन गाडगं लपवायचे कारण नाही, असे म्हणत काही चुकलं असेल तर त्यावर वरिष्ठांनी बसून नियोजन करायला हवं. सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील निवडणुकीत आपला नंबर लागावा अशी इच्छा आहे. ती इच्छा पूर्ण होईपर्यंत काम करायचं आहे. शहरातील सर्व प्रश्नांच्या बाबतीत आम्ही सगळे सर्वसामान्य जनतेच्या सोबत आहोत असे दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रम प्रसंगी अरुण बोराडे यांनी कामगारांच्या समस्या मांडल्या. कामगारांबद्द बोलताना बोराडे म्हणाले, हिंदुस्थान अँटिबायोटिक सारख्या कंपनीला सुरू ठेवण्यासाठी पूर्वीच्या सरकारने कोट्यावधींचा निधी दिला. त्यावेळी सरकार कामगारांच्या पाठीशी असल्याने कामगारांना पाहिजे तेवढे उत्पन्न देत होते. परंतु सन 2014 साली केंद्रातील नेतृत्व बदलले आणि एच ए कंपनीतील कामगारांचे तब्बल 16 महिने पगार रखडले.

मात्र पवार साहेबांना याबाबत मध्यरात्री मेल करून सांगितले असता मध्यरात्रीच साहेबांनी रिप्लाय देऊन मुंबईला बोलावून घेतलं. साहेबांनी मोदींना फोन केला आणि मोदींनी त्यांच्या सचिवांना आदेश दिले की पवार साहेब म्हणतील तसं करा. त्यानंतर केंद्राने 100 कोटी रुपये कामचलाऊ म्हणून दिले. पण हा निधी कमी होता. त्यानंतर 280 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव साहेबांनी पुन्हा केंद्राकडे पाठवला. बजाज, सेंच्युरी एन्का अशा अनेक कंपन्यांचे प्रश्न आहेत. कामगार कायद्याने कामगारांना वाली राहिला नाही. नव्या कायद्यानुसार कंपनीला वाटेल तेंव्हा कंपनी कामगारांना काढू शकते, असे बोराडे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button