breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रराजकारण

“शेतकरी कंबरेएवढ्या पाण्यात उभा असताना राष्ट्रवादीचे सोहळे”, पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षपणे साधला धनंजय मुंडेंवर निशाणा

संभाजीनगर |

मराठवाड्यात एकीकडे पुराने थैमान घातलं असताना राष्ट्रवादीचे सोहळे सुरू असल्याची टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलीय. तसेच मागील २ वर्षांपासून शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. पंकजा मुंडे यांनी तातडीने नजर पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केलीय. तसेच केवळ पिकांना नाही तर वाहून गेलेली जमीन, गुरंढोरं, मालमत्तेचं नुकसान यासाठीही पॅकेजची घोषणा करण्याची मागणी केलीय. त्या एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी सर्वात आधी प्रशासन आणि शासन हे हलायला पाहिजे. पालकमंत्र्याने त्यांच्या जिल्ह्यातील प्रत्येक बारीक विषय मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यापर्यंत नेला पाहिजे. त्यासाठीच पालकमंत्री असतात. त्यामुळे आधी पालकमंत्र्यांनी आपआपल्या जिल्ह्यात गेलं पाहिजे. जेव्हा आम्ही बांधावर गेलो त्यानंतर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे शेतकऱ्याच्या बांधावर गेले. आधी खासदार प्रीतम मुंडेंनी पुराची पाहणी केली. त्यावेळी राष्ट्रवादीचे मोठमोठे सोहळे चालले होते. खरंतर तेव्हा नुकतीच जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन गेली होती. त्याचे संवादाचे मेळावे न होता सोहळे झाले.”

  • “सरकारने शेतकऱ्यांना २ वर्षांपासून विमा का दिला नाही?”

“आमचा आक्षेप राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांना नाही. त्यांनी २ वर्षांपासून विमा का दिला नाही. शेतकऱ्यांना कोणतंही अनुदान का मिळालं नाही. आमच्यावेळी शेतकऱ्यांना वेळोवेळी बोंडअळी आल्यावर अनुदान, नुकसान भरपाई, अतिवृष्टीची मदत मिळत होती. तेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले. यांनी अट्टाहास करुन बँकेवर प्रशासक आणला. आज बँकेची पगार द्यायचीही परिस्थिती नाही. आम्ही तोट्यातील बँक सुरळीतपणे चालवत होतो. त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत मिळत होती. आज बँकेसमोर शुकशुकाट आहे. हे चांगल्या कामाचं लक्षण नाही,” असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं.

  • “अतिवृष्टीसाठी तात्काळ पॅकेज जाहीर करण्याची गरज”

पंकजा मुंडे म्हणाल्या, “आज बीड जिल्हाच काय पण मराठवाडा अधांतरी आहे. अतिवृष्टीसाठी तात्काळ पॅकेज जाहीर करण्याची गरज आहे. हे पॅकेज केवळ पिकांसाठी नाही तर वाहून गेलेल्या जमिनीसाठी, मालमत्तेच्या नुकसानासाठी, गुरंढोरं वाहून केले त्यासाठी लागेल. अन्नधान्य भिजून गेले अशा शेतकऱ्यांना खाण्यासाठी पंचायत होणार आहे. त्यांनाही त्याचा पुरवठा करण्याची गरज आहे.”

  • “कंबरेएवढ्या पाण्यात उभा असणारा शेतकरी ई पंचनामा कसा करणार?”

“पंचनामा करण्याला विरोध नाही, पण जिथं आधीच कंबरेएवढ्या पाण्यात शेतकरी उभा आहे तिथं फोटो काढून ई पंचनामा कसा करु असा प्रश्न शेतकरी विचारत आहे. त्यामुळे नजर पंचनामा आहे त्याचा उपयोग करावा. नजर फिरवल्यावर जे दिसतंय त्यावरुन तुम्ही मदत द्या आणि नंतर बाकीचं ठरवा,” अशी मागणी पंकजा मुंडेंनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button