breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“अनगाईडेड मिसाईलसारखं आवाहन करून…”, अमरावती हिंसाचारावर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

मुंबई |

त्रिपुरामध्ये काही प्रार्थनास्थळांची नासधूस करण्याच्या निषेधार्थ अमरावती, मालेगाव, नांदेड या भागांमध्ये बंद पुकारण्यात आला होता. आज दुसऱ्या दिवशी अमरावतीमध्ये या बंददरम्यान काही हिंसक घटना घडल्यानंतर त्यावर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अमरावतीमध्ये या बंदला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांकडून देखील जमावावर लाठीचार्ज करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अमरावतीमधील घटना आणि राज्यात व्यक्त होत असलेल्या भावनांवर प्रतिक्रिया दिली आहे.

  • आंदोलन करणे हा लोकांचा अधिकार, पण…

अशा प्रकारे आंदोलनाला हिंसक वळण लागण्याचा नवाब मलिक यांनी निषेध केला आहे. “ज्या पद्धतीने त्रिपुरामध्ये हिंसा झाली, त्यासोबतच वसीम रिझवीने लिहिलेल्या पुस्तकाविरोधात काही संघटनांनी बंद पुकारला होता. यादरम्यान, नांदेड किंवा इतर ठिकाणी काही हिंसा झाली आहे. या हिंसेचा आम्ही निषेध करतो. आंदोलन करणे किंवा निषेध दर्शवणे हा लोकांचा अधिकार आहे. पण अनगाईडेड मिसाईलसारखं आवाहन करणं आणि त्याच्यावर नियंत्रण नसणं हे योग्य नाही. त्यामुळे जे कुणी आंदोलन पुकारत असतील त्यांनी नियोजनपद्धतीने आंदोलन होईल आणि त्यात हिंसा होणार नाही ही खबरदारी घेतली पाहिजे. जे काल घडलं, ते योग्य नाही. जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. लोकांनी शांतता ठेवायला हवी”, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

  • “…म्हणून देशातलं वातावरण बिघडत आहे”

“वसीम रिजवी गेल्या काही वर्षांपासून देशातला सलोखा कसा बिघडेल, यासाठी वारंवार विधानं करत आहेत. लोकांच्या भावना कुठेतरी दुखावण्याचं काम करत आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. नियोजनपद्धतीने देशातलं वातावरण बिघडवण्याचं काम सुरू आहे. वसीम रिजवी शिया वक्फ बोर्डाचे संचालक होते. त्यांनी तिथे घोटाळा केला. २०१६-१७मध्ये त्यांच्या विरोधात युपी पोलिसांकडे तक्रार झाल्यानंतर शिया समुदायाच्या धर्मगुरुंनी तक्रार केल्यानंतर ही सर्व प्रकरणं वर्षभरापूर्वी सीबीआयकडे देण्यात आलं.

मात्र, त्यावर कोणतीही कारवाई न करता वसीम रिजवीला मोकळीक देण्यात आली. त्यामुळे देशातलं वातावरण बिघडत आहे. वसीम रिजवीवर तात्काळ कारवाई केली गेली पाहिजे”, असा दावा देखील नवाब मलिक यांनी केला. “मी लोकांना आवाहन करतो, की आंदोलन करणं हा तुमचा अधिकार आहे. पण आंदोलनाला हिंसक वळण लागत असेल, तर ते योग्य नाही. लोकांनी शांतता ठेवायला हवी. जे कुणी हिंसेला जबाबदार असेल, त्यांच्यावर सरकारकडून कारवाई होईल”, असंही नवाब मलिक म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button