ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाशिक; भूकंप वेधशाळांचे होणार आधुनिकीकरण

 नाशिक | प्रतिनिधी

महाराष्ट्रातील भूकंप वेधशाळा व त्‍यांतील उपकरणांचा आढावा व आधुनिकीकरणासाठी स्थापन समितीच्‍या शिफारशींनुसार या वेधशाळांचे आधुनिकीकरण होणार आहे. त्‍यामुळे संभाव्‍य धोक्‍यांबाबतची माहिती वेळीच व अचूक मिळण्यास मदत होईल.

जलसंपदा विभागाच्‍या शासन निर्णयात काही प्रस्‍ताव स्‍वीकृत, काही अंशतः स्‍वीकृत तर काही प्रस्‍तावांबाबत अस्‍वीकृती दर्शविली आहे. विद्यमान भूकंपीय वेधशाळांचा आढावा घेण्यात येणार आहे. सद्य:स्‍थितीतील बहुतांश उपकरणे कालबाह्य किंवा जुनी झालेली असल्‍यामुळे त्‍यांची देखभाल-दुरुस्‍ती करणे शक्‍य होत नाही. सध्या मोठ्या प्रमाणावर भूकंपीय वेधशाळा स्‍थापित करण्याची गरज नाही. आयएस-४९६७ व केंद्रीय जल आयोगाच्‍या मार्गदर्शक तत्त्‍वांनुसार मोठ्या धरणांवर ॲक्‍सेलोग्राफ्‍स बसविण्याच्‍या संदर्भातील प्रस्‍तावाला अंशतः स्‍वीकृती मिळालेली आहे.

नवीन धरणाचे संकल्‍पचित्र सुरू करण्याच्या किमान पाच वर्षे आधी धरण बांधकामाच्‍या स्‍थळाचा भूकंपीय अभ्यास करण्यासाठी संबंधित ठिकाणी भूकंपीय वेधशाळांचे स्‍थानिक जाळे स्‍थापित करावे. त्‍यातील माहितीचा वापर धरणाच्‍या संकल्‍पचित्रामध्ये करावा. नवीन धरण बांधण्याच्‍या नियोजनासाठी त्‍यापूर्वी तेथील सूक्ष्म भूकंपांचा अभ्यास एक वर्षासाठी केल्‍यास त्‍या भागातील भूकंप क्षमता व सक्रिय भूकंपांबाबतची माहिती धरणाच्‍या नियोजनासाठी उपलब्‍ध होण्यास पुरेसी असेल. नवीन मोठे धरण हाती घेण्यापूर्वी अशा वेधशाळांचे जाळे त्‍या ठिकाणी स्‍थापित करण्याबाबत शासनाने विचार करण्याबाबतचा प्रस्‍ताव स्वीकारला आहे.

प्रशिक्षण बंधनकारक

भूकंप वेधशाळेमध्ये कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांना सीडब्‍ल्‍यूपीआरएस, पुणे येथे यासंदर्भातील प्रशिक्षण देणे अनिवार्य करण्याचा प्रस्‍ताव स्‍वीकृत केला आहे. त्‍यामुळे अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण बंधनकारक केले जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरासंदर्भात प्रशिक्षणाचा मुद्दाही अहवालात मांडलेला आहे. त्‍यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये कौशल्‍य विकास साधला जाईल.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

भूकंपीय वेधशाळेचे विद्यमान नेटवर्क आणि उपकरणांचे आधुनिकीकरण करीत रिअल टाइम डेटा संकलनासाठीचा मुद्दा मांडण्यात आला आहे. उपलब्‍ध आधुनिक तंत्रज्ञानाच्‍या दृष्टीकोनातून संकलन संप्रेषणाद्वारे प्रसारण, संचयन, विश्र्लेषण आणि प्रसार करण्यासाठी हार्डवेअर व सॉफ्टवेअर तसेच अन्‍य उपाययोजना सुचविलेल्‍या आहेत. त्‍यासाठी केंद्रीकृत डेटा विश्र्लेषण केंद्र स्‍थापन करण्याबाबतच्या प्रस्‍तावाचाही समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button