breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

नरेंद्र गिरींच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून मृत्यूचं खरं कारण आलं समोर

नवी दिल्ली |

अ.भा. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूमुळे सध्या खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी अलाहाबादेतील बाघंबरी मठात त्यांच्या शिष्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला होता. यावेळी नरेंद्र गिरी यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. सुसाईड नोटमध्ये त्यांनी अनेक गंभीर आरोप करत अनेकांना आत्महत्येसाठी जबाबदार धरलं होतं. यानंतर ही हत्या असावी असा संशय व्यक्त केला जात होता. पोलिसांनी याप्रकरणी तपास करत त्यांचे शिष्य आनंद गिरी याला अटक केली आहे. अटकेनंतर न्यायालयात हजर केलं असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

पोलिसांनी नरेंद्र गिरींच्या मृत्यूप्रकरणी आनंद गिरी याच्यासहित बडे हनुमान मंदिराचा पुजारी आद्य प्रकाश तिवारीला अटक केली आहे. मृत्यूनंतर काही वेळातच पोलिसांनी आनंद गिरी आणि तिवारीला ताब्यात घेतलं होतं. नरेंद्र गिरी यांनी १४ पानांच्या सुसाईड नोटमध्ये दोघांनाही आत्महत्येसाठी जबाबदार धरलं होतं. नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी मंगळवारी १८ सदस्यांचे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केलं होतं. या मृत्यूशी संबंधित सर्व पैलूंचा तपास करण्यात येत असून दोषींची गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं. मृत्यूचं कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पोस्टमॉर्टम करण्यात आलं. या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट समोर आला असून फास घेतल्याने गुदमरुन मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळे नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराजमधील एसआरएन हॉस्पिटलमध्ये पाच डॉक्टरांच्या टीमकडून पोस्टमॉर्टम करण्यात आला. यावेळी त्यांनी व्हिडीओ रेकॉर्डिंगदेखील केलं आहे. नरेंद्र गिरी यांच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नाहीत. यामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचं स्पष्ट होत आहे. “पोस्ट मॉर्टम रिपोर्टमध्ये नरेंद्र गिरी यांच्या गळ्याभोवती फास घेतल्यानंतर येणारा व्ही मार्क दिसत आहे,” अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांना व्हिसेरा जपून ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. जेणेकरुन इतर कोणत्या शक्यतांबाबतही स्पष्टता येईल.

  • पार्थिवावर अंत्यसंस्कार

महंत नरेंद्र गिरी यांच्या पार्थिवावर बुधवारी अलाहाबादेतील बाघंबरी मठात अंत्यसंस्कार करण्यात आले. यापूर्वी, गंगा, यमुना व पौराणिक सरस्वती या नद्यांच्या संगमावर पार्थिवाला स्नान घालण्यात आले. दुपारी ३ वाजताच्या सुमारास एका लिंबाच्या झाडाखाली महंतांना ‘भू समाधी’ देण्यात आली.

  • ‘राज्य सरकारकडून सत्य लपवण्याचा प्रयत्न’

नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआयमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी मेरठमध्ये केली. राज्य सरकार या साधूच्या अनुयायांची दिशाभूल करत असून, सत्य लपवण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. उत्तरीय तपासणी करण्यापूर्वीच ही आत्महत्या होती की खून याबाबतचा निष्कर्ष पोलिसांनी कसा काढला, असा प्रश्न त्यांनी विचारला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button