breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबईराजकारणलेख

शिवसेना-राष्ट्रवादीला शह देण्यासाठी नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवारांची केंद्रात वर्णी

महाराष्ट्रात युतीतून बाहेर पडून महाविकास अाघाडीत सामील झालेल्या शिवसेनेला शह देण्याच्या व्यूहरचनेचा एक भाग म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे बघितले जात अाहे. काेकणातील प्रतिनिधित्वासाठी नारायण राणे, मराठवाड्यातून भागवत कराड, उत्तर महाराष्ट्रातून भारती पवार अाणि ठाणे जिल्ह्यातून कपिल पाटील यांना केंद्रात मंत्रिपदे दिली गेली. शिवाय भाजपचा मतदानाचा टक्का वाढवण्याच्या हेतूनेही जातीय समीकरणे बांधत केंद्रीय मंत्रिमंडळ फुगवण्यात आले आहे.

नारायण राणे : सहा वर्षांनंतर मिळाले मंत्रिपद
नारायण तातू राणे यांचा जन्म २० एप्रिल १९५२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरवडे गावात झाला. विशीत असतानाच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. १९६८ मध्ये ते चेंबूरचे शाखाप्रमुख झाले. १९८५ मध्ये मुंबई महानगरपालिकेचे बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर नगरसेवक, ‘बेस्ट’चे अध्यक्ष आणि १९९० साली कणकवली-मालवण विधानसभा मतदारसंघातून आमदार बनले. महाराष्ट्रात घडलेल्या १९९१ च्या राजकीय नाट्यानंतर छगन भुजबळांनी शिवसेना सोडली आणि विधिमंडळातल्या विरोधीपक्ष नेतेपदाची संधी आमदार नारायण राणेंकडे चालून आली. त्यानंतर शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये राणे १९९६ ला महसूलमंत्री झाले. या सरकारच्या शेवटच्या टप्यात मनोहर जोशी यांचा राजीनामा घेऊन १ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९ या काळात राणेंना मुख्यमंत्री पदावर बसवण्यात आले. १९९९ मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार आले.

राणे विरोधी पक्षनेते झाले. बाळासाहेब ठाकरे यांनी २००३ साली महाबळेश्वर येथील अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड केल्यानंतर राणे दुखावले. २००४ साली त्यांनी शिवसेना सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मालवण विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करून विक्रमी मताने निवडून आले. त्यांची आघाडी सरकारमध्ये महसूलमंत्री पदी वर्णी लागली. २००८ मध्ये ते उद्याेग मंत्री झाले. मात्र मुख्यमंत्री हाेण्याच्या महत्त्वाकांक्षेतून त्यांनी काँग्रेसही साेडली. २०१८ मध्ये स्वत:चा ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ काढला. याच दरम्यान नारायण राणे भाजपच्या तिकिटावर राज्यसभेवर गेले. नारायण राणे यांचा स्वाभिमानी पक्षही भाजपमध्ये विलीन झाला.

डॉ. भारती पवार : मिनी मंत्रालयात संधी हुकली होती
नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी हुकलेल्या डाॅ. भारती प्रवीण पवार यांना खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये थेट केंद्रीय मंत्रालयात राज्य मंत्रिपदावर संधी मिळाली. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महिला अाघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावर अाक्रमक चेहरा असलेल्या डाॅ. पवार यांनी सन २०१९ च्या लाेकसभा निवडणुकीप्रसंगी शेवटच्या क्षणी भाजपत प्रवेश करून थेट खासदार झाल्याने चर्चेत अाल्या हाेत्या. डाॅ. पवार यांच्या रूपाने १९६२ नंतर प्रथमच नाशिकला केंद्रीय मंत्रिपद मिळाले आहे. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या भारती पवार यांचे पितृछत्र हरपले हाेते. अाईने माेठ्या कष्टाने त्यांना उच्च शिक्षित केले.

माजी मंत्री स्वर्गीय ए.टी.पवार यांचे पुत्र प्रवीण पवार यांच्याशी त्यांचा विवाह झाल्यानंतर त्यांचा राजकारणाशी सबंध अाला. सन २०१२ ते २०१७ या कालावधीत त्यांनी राष्ट्रवादी कांॅग्रेसच्या तिकिटावर देवळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या उमराणे गटातून उमेदवारी करत विजय मिळवला हाेता. त्यांच्या जाऊबाई जयश्री पवारही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्या हाेत्या. डाॅ. भारती पवार यांचे नाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत हाेते. मात्र ए.टी. पवार यांचे पुत्र नितीन यांनी तत्कालीन मंत्री छगन भुजबळ व अजित पवार यांच्याशी असलेल्या सलाेख्यामुळे त्यांच्या पत्नी जयश्री पवार यांचे नाव पुढे केल्याने डाॅ. भारती पवार यांची अध्यक्षपदाची संधी हुकली होती.

नाशिक जिल्ह्याला पहिल्यांदाच संधी
१९६२ मध्ये भारत- चीन युद्धानंतर पंतप्रधान पंडित नेहरू यांनी यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीत बोलावून घेऊन संरक्षणमंत्री केले. तेव्हा झालेल्या पोटनिवडणुकीत यशवंतराव चव्हाण नाशिक मतदारसंघातून बिनविरोध निवडून गेले. दादासाहेब गायकवाड यांनी निवडणुकीतून माघार घेतली हाेती. त्यानंतर प्रथमच डाॅ. पवार यांच्या रूपाने पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळात जिल्ह्याला प्रतिनिधीत्व मिळाले.

कपिल पाटील : आगरी समाजाची मते मिळतील
ठाणे जिल्ह्यातील महापालिका निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी तसेच ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्र असलेल्या आगरी-कोळी समाजाला भाजपकडे ओढण्यासाठी भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागली आहे. नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास भूमिपुत्र असलेल्या आगरी-कोळी समाजाचा विरोध आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात कोळी-आगरी मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा डाव आहे. पाटील यांना मंत्रिपद देऊन ठाणे, पालघर जिल्ह्यात शिवसेनेच्या विरोधात आगरी समाजाचा संघर्ष तीव्र करण्याची भाजपची रणनीती आहे. आगरी समाजाचे नेते अशी त्यांची ओळख आहे.

राजकीय प्रवास
कपिल पाटील भिवंडी तालुक्यातील दिवे अंजूर गावचे सरपंच होते. पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदही भूषवले. २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. २०१४ व २०१९ मध्ये भिवंडी लोकसभा मतदार संघातून विजय संपादित. त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button