breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

पाच महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाबाबत नाना पटोलेंनी मांडली भूमिका…

मुंबई |

नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर पाच महिने राज्य विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त आहे. अर्थसंकल्पीय आणि पावसाळी अशा दोन अधिवेशनांमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने टाळली. अध्यक्षपद काँग्रेसकडेच कायम राहील, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिली असतानाही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाणीवपूर्वक अध्यक्षपदाची निवडणूक टाळली जात असल्याचा काँग्रेस नेत्यांचा आक्षेप आहे. महाविकास आघाडी मतांच्या फाटाफुटीच्या भीतीनेच अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

अध्यक्षपदाची निवडणूक लवकरच घेतली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्राद्वारे कळविले असले तरी ही निवडणूक नक्की कधी होणार याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. दोन अधिवेशनांमध्ये निवडणूक टाळण्यात आली यामुळे हिवाळी अधिवेशनात होईलच याची काय खात्री, असे काँग्रेस नेते बोलू लागले असताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी अध्यक्षपदाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

नाना पटोले सध्या राहुल गांधी यांच्या दिल्ली येथील घरी भेटीसाठी दाखल झाले आहे. १२ तुघलक लेन या राहुल गांधींच्या निवासस्थानी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. बैठकीला एच के पाटील आणि केसी वेणुगोपाल हे देखील उपस्थित असणार आहेत. बैठकीआधी नाना पटोले यांनी एबीपी माझासोबत संवाद साधला त्यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाबाबत भूमिका मांडली आहे. “कृषी कायदा हा सध्या पब्लिक डोमेनमध्ये आहे. दोन महिन्यांनंतर त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा व्हावा अशी भूमिका काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची आहे. त्यावेळी हे विधेयक आल्यानंतर विशेष अधिवेशषनामध्ये अध्यक्षपदांच्या निवडणुका व्हाव्यात अशी भूमिका आहे,” असे नाना पटोलेंनी म्हटले.

  • संग्राम थोपटे यांच्याकडे अध्यक्षपद?

पुणे जिल्ह्यातील भोरचे तिसऱ्यांदा निवडून आलेले आमदार संग्राम थोपटे यांचे नाव अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये आघाडीवर आहे. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसने महत्त्वाच्या पदावर कोणाला संधी दिलेली नाही. याशिवाय पुणे जिल्ह्यात काँग्रेसच्या कोणाकडेही पद नाही. या साऱ्यांचा विचार करून थोपटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी एच. के. पाटील हे शनिवारी मुंबईत येत असून, आमदारांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर दिल्लीतून काँग्रेसचे नाव निश्चित केले जाईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button