कोयत्याने वार करत तरुणावर खुनी हल्ला
पिंपरी l प्रतिनिधी
कोयत्याने वार करत तसेच लाकडी दांडक्याने मारून तरुणावर खुनी हल्ला केला. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 20) रात्री आठ वाजताच्या सुमारास नवी सांगवी आणि पिंपळे गुरव येथे घडली.
अक्षय शत्रुघ्न सांगळे (वय 29, रा. पिंपळे गुरव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोन्या धिवार, आशित धिवार (दोघे रा. रामनगर, नवी सांगवी) आणि तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री फिर्यादी यांचा मावस भाऊ प्रज्वल अंकुश जाधव (वय 18) आणि त्याचे मित्र नवी सांगवी येथून दुचाकीवरून जात असताना त्यांचे आरोपींसोबत भांडण झाले. त्यानंतर फिर्यादी आणि त्यांचा भाऊ पिंपळे गुरव येथे गेले असता आरोपींनी फिर्यादी यांच्यावर कोयत्याने वार केले. तसेच लाकडी दांडक्याने हातावर, डोक्यावर मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तीन अनोळखी व्यक्तींनी लाकडी दांडक्याने पायावर मारून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.