ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अपघाताचा बनाव करून तरुणाचा खून

परभणी | पालम तालुक्यातील तेजलापूर येथील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना २१ जुलै रोजी पहाटे २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या चार दिवसांत आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. बैलचोरीच्या प्रकरणासह चार चाकी वाहनाच्या खरेदीतून हा खून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

मिळालेल्या माहितीनुसार, ताडकळस पोलीस ठाण्याचे सपोनि विजय रामोड, सपोनि सय्यद, जमादार भिंगे, कणके हे ताडकळस हद्दीत रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना गुरुवारी पहाटे खडाळा शिवारातील कॅनॉलजवळ पालम कृष्णा मंचक कदम (वय २६) या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली.

याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला संशयित पिराजी अंबादास धबडगे, गजानन रंगनाथ धबडगे, शंकर पिराजी धबडगे (रा. मिरखेल) यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर चौकशी करत असताना बैलचोरीचे प्रकरण बाहेर जाऊ नये तसंच कृष्ण कदम यांच्याकडून विकत घेतलेल्या चारचाकी वाहनाचे पैसे द्यावे लागू नयेत, या कारणातून आरोपींनी संगनमत करुन कदम यांचा खून केला. तसंच खूनाचा प्रकार लक्षात येऊ नये म्हणून कृष्णा कदम यांच्या अंगावरून गाडी घालत अपघात झाल्याचा बनावही केला.

दरम्यान, पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३०२, २०१, ३४ भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना सपोनि विजय रामोड यांनी रविवारी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या हत्या प्रकरणात इतर काही आरोपींचा सहभाग आहे का, याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button