breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका घनकचरा व्यवस्थापनासाठी 4 ट्रान्सफर स्टेशन उभारणार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात दररोज निर्माण होणा-या घनकच-याचे योग्य रितीने व्यवस्थापन करण्यासाठी शहरात चार ठिकाणी कचरा हस्तांतरण केंद्रे (ट्रान्सफर स्टेशन) उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे ओला व सुका कचरा कॉम्पॅक्ट करून हूक लोडर वाहनाद्वारे मोशी कचरा डेपो येथे नेणे शक्य होणार आहे. या कामासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून 22 कोटी 20 लाख रूपये इतका खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यासाठी 15 व्या वित्त आयोगाकडून अनुदान मिळविण्यासाठी प्रशासकीय मान्यता घेण्यात येणार आहे.

उद्योगनगरीत दररोज निर्माण होणा-या घनकच-याचे योग्य रितीने व्यवस्थापन होण्यासाठी मोशी कचरा डेपो येथे सुमारे 81 एकर इतकी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. महापालिका हद्दीत प्रतिदिन सुमारे एक हजार मेट्रीक टन कच-याची निर्मिती होते. शहरातून वेगवेगळ्या क्षेत्रातून घनकचरा मोशी कचरा डेपो परिसरात आणला जातो. शहरात सुमारे 25 ते 30 ठिकाणी रस्त्याकडेला किंवा मोकळ्या जागेवर संकलन केंद्र कार्यान्वित आहेत.

हा कचरा कॉम्पॅक्टरद्वारे शहरातील ब-याच भागातून गोळा करत असताना इंधनाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. हवेचे प्रदुषणही होते. लिचेटची गळती रस्त्यावरून होते. तसेच दुर्गंधीचा त्रासही होतो. त्यामुळे परिसरातून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असतात. हे टाळ्ण्यासाठी महापालिका उपायुक्तांनी इंदोर शहराच्या धर्तीवर पहिल्या टप्प्यात महापालिका हद्दीत किमान चार ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन उभारण्याबाबत सुचना दिल्या आहेत.

महापालिका आयुक्तांच्या 17 सप्टेंबर 2021 रोजीच्या मान्य प्रस्तावानुसार कासारवाडी मैलाशुद्धीकरण प्रकल्प, काळेवाडीतील एस. एम. कॉलेजसमोरील स्मशानभुमीजवळील जागा, जुनी सांगवी येथील नदीच्या बाजूची पाटबंधारे विभागाची जागा, सेक्टर 23 – निगडीतील गायरान जागा, भोसरी-गवळीमाथा येथील कचरा स्थानांतर केंद्र या जागांपैकी चार ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन उभारण्याचे नियोजन आहे. हे ट्रान्सफर स्टेशन उभारल्यामुळे त्या-त्या भागातील ओला व सुका कचरा छोट्या गाडीतून एकाच ठिकाणी गोळा होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button