ताज्या घडामोडीमुंबई

मुंबई मेट्रोच्या ११ मालमत्तांना पालिकेकडून जप्तीची नोटीस; आठ मेट्रो स्थानकांचा समावेश

मुंबई | पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेला मालमत्ता कर थकविणाऱ्या मुंबई मेट्रोच्या ११ मालमत्तांवर जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये मेट्रोच्या आठ स्थानकांचा समावेश आहे.

मुंबई मेट्रोने २०१३ पासून आजतागायत ११७ कोटी ६२ लाख रुपये मालमत्ता कर थकविला आहे. नोटीस बजावल्यानंतरही कर भरणा न केल्यास या मालमत्तांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. देशात वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेला जकात कर बंद करण्यात आला. त्यानंतर मोठा महसूल मिळवून देणारा मालमत्ता कर पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत बनला आहे. करोनाकाळामध्ये पालिकेच्या महसुलावर परिणाम झाला असून मालमत्ता कराची वसुली करण्यावर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे मोठया थकबाकीदारांची यादी तयार करून कर वसुली सुरू करण्यात आली आहे, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई मेट्रोने २०१३ पासून आजपर्यंत तब्बल ११७ कोटी ६२ लाख रुपये मालमत्ता कर थकविला आहे. कराची वसुली करण्यासाठी पालिकेने मुंबई मेट्रोच्या ११ मालमत्तांवर गुरुवारी जप्तीची नोटीस बजावली. नोटीस बजावलेल्या मालमत्तांमध्ये आझादनगर मेट्रो स्थानक, डी. एन. नगर मेट्रो स्थानस, वर्सोवा मेट्रो स्थानक, एलआयसी अंधेरी मेट्रो स्थानक. पश्चिम द्रुतगती महामार्ग मेट्रो स्थानक, जे. बी. नगर मेट्रो स्थानक, एअरपोर्ट रोड मेट्रो स्थानक, मरोळ मेट्रो स्थानक या आठ स्थानकांचा समावेश आहे.

थकीत कराची रक्कम २१ दिवसांमध्ये भरण्याचे निर्देश या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत. या कालावधीत थकबाकीची रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा न केल्यास या मालमत्तांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यानंतरही कर न भरल्यास मलनिस्सारण वाहिनी खंडित करण्यात येणार आहे. अखेर या मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पालिकेच्या के-पूर्व आणि के-पश्चिम विभाग कार्यालयातील करनिर्धारण व संकलन विभागातील अधिकाऱ्यांनी आपापल्या हद्दीतील मुंबई मेट्रोच्या संबंधित मालमत्तांवर जप्तीची नोटीस चिकटवली. यात के-पूर्वच्या हद्दीत सहा, तर के-पश्चिमच्या हद्दीतील पाच मालमत्तांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button