TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपुणे

महापालिका ‘पीएमसी केअर’ नावापुरतेच

पुणे | प्रतिनिधी

महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांना एखादी समस्या कळवता यावी, दाद मागता यावी, प्रशासनाचे लक्ष वेधता यावे, यासाठी महापालिकेने ‘पीएमसी केअर’ ही यंत्रणा उभी केली. मात्र, तक्रार केल्यानंतर एक-दोन दिवसांत कोणतीही शहानिशा न करताच तुमची तक्रार ‘बंद’ करण्यात आली आहे, असे ठोकळेबाज उत्तर दिले जात असल्याचा सार्वत्रिक अनुभव आहे. त्यामुळे महापालिकेने ‘पीएमसी केअर’च बंद करून त्याऐवजी प्रभावी यंत्रणा उभारावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

नागरिकांना सातत्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागते. पाणीपुरवठा बंद असणे, जलवाहिनी फुटणे, मलवाहिनी तुंबणे, भटक्या जनावरांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, अनधिकृत बांधकामे, अडथळे, खड्डे, पदपथ, बसथांब्यांची दुरवस्था अशा विविध समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागतो. अनेकदा नगरसेवकांच्या माध्यमातून या समस्या मार्गी लागतात. परंतु, काही नागरिकांना नगरसेवकांची मदत घेता येत नाही किंवा त्यांची मदत न घेता महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून समस्या सुटावी, अशी त्यांची मागणी असते. त्यासाठीच ‘पीएमसी केअर’ ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. मात्र, काही अपवाद वगळता यावर नोंदवलेल्या तक्रारींवर प्रत्यक्ष कार्यवाही न होताच समस्या ‘बंद’ करण्यात आल्याचेच उत्तर महापालिकेकडून दिले जात आहे. मूळ समस्या मात्र, कायम राहत असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

‘तक्रार करूनही उपयोग नाही’

कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर सनफ्लॉवर सोसायटी आहे. या सोसायटीच्या मागे सिद्धार्थनगर झोपडपट्टी आहे. कचरा संकलनासाठी या झोपडपट्टीत येणारी घंटागाडी काही महिन्यांपासून बंद झाली आहे. त्यामुळे झोपडपट्टीतील नागरिक सनफ्लॉवर सोसायटीलगत ओला व सुका कचरा टाकत असून, सोसायटीतील रहिवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ‘आमच्या परिसरातील समस्येबाबत आम्ही क्षेत्रीय कार्यालय, आरोग्य निरीक्षकांकडे तक्रार केली. परंतु, त्याकडे दुर्लक्षच झाले. त्यामुळे ‘पीएमसी केअर’च्या माध्यमातून अनेक वेळा ऑनलाइन तक्रारी केल्या. परंतु, काहीही उपयोग झाला नाही,’ असे सोसायटीचे अध्यक्ष दीपक अंगिरवाल यांनी सांगितले. याबाबतची तक्रार त्यांनी अतिरिक्त आयुक्त; तसेच स्वच्छ सर्वेक्षण उपायुक्तांकडेही केली आहे.

‘उत्तरे स्वयंचलित पद्धतीने देतात का?’

‘स्थानिक समस्यांकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी मी अनेकदा ट्विटरवर ‘पीएमसी केअर’ ला टॅग करून माहिती दिली. त्यावर तातडीने टोकन नंबर देण्यात आला. एक दोन दिवसांनंतर या समस्येवर काहीही काम न करता ही तक्रार बंद करण्यात आल्याचाच मेसेज आला. ‘पीएमसी केअर’ नेमके करते काय, ही उत्तरे स्वयंचलित (बॉट्स) पद्धतीने दिली जातात का,’ असा सवाल कोथरूड येथील रहिवासी संतोष पाटील यांनी केला.

‘पीएमसी केअर’वर तक्रार केल्यानंतर कार्यवाही न होताच तक्रार बंद केली जाते. यावर उपाय म्हणून प्रशासनाने तक्रारीपूर्वीची स्थिती व तक्रार सोडवल्यानंतरची स्थिती (बिफोर-आफ्टर) याचे फोटो टाकल्यास या प्रक्रियेत पारदर्शकता येईल.

– सचिन जाधव, नागरिक, सिंहगड रस्ता

सिंहगड रस्त्यावर मीनाक्षीपुरम सोसायटीजवळ काही हॉटेलचालक रस्त्यावर ओला कचरा टाकत आहेत. याबाबत ‘पीएमसी केअर’वर अनेकदा तक्रार करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही.

-हितेश शहा, नागरिक, सिंहगड रस्ता

पालिकेने सेवेत सातत्य ठेवावे

स्मार्ट सिटीमध्ये पुण्याची दुसऱ्या क्रमांकाने निवड झाली त्या वेळी नागरिकांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी महापालिकेचे माजी आयुक्त कुणाल कुमार यांनी ‘पीएमसी केअर’ यंत्रणा उभारली. त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ त्यांनी तैनात केले. सुरुवातीच्या टप्प्यात अनेक नागरिकांना त्यातून चांगले अनुभव आले आणि समस्या खरोखरी मार्गी लागत असल्याचे दिसून आले. मात्र, एखादी गोष्ट सुरू करणे आणि त्यात सातत्य ठेवणे, यात कायमच महापालिका कमी पडत आली आहे. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाइन स्वरूपात तक्रार दाखल केल्यानंतरही त्यांच्या समस्या सुटत नसल्याचा अनुभव आता येत आहे. कोव्हिड-१९ च्या काळात नागरिकांच्या आरोग्याची, सुरक्षेची सर्वाधिक जबाबदारी पालिकेच्या अधिकाऱ्यांवर असल्याने ऑनलाइन तक्रार निवारण यंत्रणेकडे काही काळ दुर्लक्ष झाले असले, तरी आता सर्व बंधने आणि नियमांतून सुटका होत असताना आणि महापालिकेचा सर्व कारभार प्रशासक म्हणून अधिकाऱ्यांच्या हाती एकवटला असताना नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याकडे अधिक काटेकोर लक्ष देण्याची गरज आहे.

‘पीएमसी केअर’द्वारे तक्रार प्राप्त झाल्यानंतर तक्रारदाराला टोकन नंबर देऊन तक्रार संबंधित विभागाला पाठवली जाते. त्यावर कार्यवाही झाल्यानंतर संबंधित विभागाच्या उत्तरासहित ते संबंधित तक्रारदाराला कळविण्यात येते. यामध्ये स्वयंचलित पद्धतीने कोणतेही उत्तर दिले जात नाही किंवा तक्रार बंद करण्यात येत नाही.

– राहुल जगताप, प्रमुख, माहिती तंत्रज्ञान, पुणे महापालिका

‘पीएमसी केअर’ला टॅग करून काही मजकूर लिहिल्यास ती तक्रार आहे किंवा सूचना अथवा प्रतिसाद हे न पाहताच एकसारखेच उत्तर दिले जाते.

– किरण पवार, नागरिक

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button