TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्वच्छ शहर स्पर्धेत पिंपरी चिंचवडला प्रथम स्थान मिळवून देण्याचा महापालिकेचा संकल्प – महापौर माई ढोरे

पिंपरी | स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणा-या स्वच्छ शहर स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहराला प्रथम स्थान मिळवून देण्याचा महापालिकेने संकल्प केला असून शहरवासियांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेऊन शहराला स्मार्ट स्वच्छ शहर बनवावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७२ वा वर्धापन दिन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यानंतर महापौर माई ढोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देताना त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास आयुक्त राजेश पाटील, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, शैलेंद्र मोरे, माजी महापौर योगेश बहल , अपर्णा डोके, नगरसदस्या मिनल यादव, शर्मिला बाबर , सुजाता पालांडे, माजी नगरसेवक गोविंद पानसरे, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, विकास ढाकणे, उल्हास जगताप , कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, स्विकृत सदस्य सुनिल कदम, यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

भारतीय नागरिकांमध्ये आपल्या संविधानाबद्दल नितांत आदर आहे. घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातुन साकारलेल्या संविधानामध्ये समाजातील सर्व घटकांना सामावुन घेण्यात आले आहे. देशाची एकता आणि एकात्मता संविधानामुळे अधिक मजबुत झाली आहे, असे नमूद करून महापौर माई ढोरे म्हणाल्या, देशाचा विकास हा शहराच्या विकासावर अवलंबून असतो. पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी योगदान देणा-या प्रत्येकाचा त्याग महत्वपूर्ण आहे. कामगार, कष्टकरी आणि इथल्या उद्योगधंद्यांनी या नगरीला वैभवशाली बनविले. शहरातील कष्टकरी, कामगार, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शिक्षक, व्यापारी, उद्योजक, पोलीस, सैनिक, डॉक्टर, अभियंते, संशोधक, शास्त्रज्ञ, खेळाडू, कलावंत, साहित्यिक अशा सर्वांच्या त्यागातून, परिश्रमातून, योगदानातून आजची पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरी घडली आहे. या शहराला स्मार्ट सिटी बनवणा-या सर्वांप्रती महापौर ढोरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

कोरोना काळात काम करणा-या सर्व कोरोना योध्दयांचे देखील त्यांनी आभार मानले. विविध उपक्रम आणि विकास कामांबद्दल माहिती देताना महापौर माई ढोरे म्हणाल्या, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्टया दुर्बल घटकासांठी घरे देण्याचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. इंद्रायणी,पवना आणि मुळा या नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. घनकचरा व्यवस्थापन, नदी सुधार प्रकल्प, मैला शुध्दीकरण केंद्र पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. महिला, विद्यार्थी, दिव्यांगांसाठी विविध योजना महापालिका राबवित आहे. लाईट हाऊस उपक्रम सुरु करुन महिलांना स्वंयरोजगाराबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या पत्नींना सिम्बॉयसिस विद्यापिठाच्या सहकार्यातुन व्यवसाय प्रशिक्षण कोर्स सुरु केलेले आहेत. शहरातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी विविध प्रकल्प सुरू आहेत. आंद्रा आणि भामा आसखेड धरणांतून पाणी आणण्यासाठीचा प्रकल्प शहरासाठी महत्वाचा असल्याचे महापौरांनी सांगितले.

स्मार्ट सिटीच्या कामाबद्दल बोलताना महापौर ढोरे म्हणाल्या, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरात ऑप्टीकल फायबर नेटवर्कचे जाळे टाकण्यात येत आहे. निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्र आणि वायसीएम रुग्णालयामध्ये सौर उर्जा प्रकल्प राबवला आहे. शहरातील विद्यार्थ्यांना रोजगार मिळवुन देणारे अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्यातुन महापालिकेने स्कील डेव्हलपमेंट उपक्रम सुरु केला आहे. उद्योगक्षेत्रामध्ये नवनिर्मिती, सहयोग आणि उद्योजकता यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्ट अप आणि इनक्युबेशन सेंटर सुरु करण्यात आले आहे.शहरात सीसीटीव्ही जाळे टाकण्याचे काम सुरु आहे. शिवाय महापालिकेच्या १२३ शाळा अद्यावत तंत्रज्ञानाने विकसित करण्यात येणार असुन शिक्षण पध्दतीला अधिक चालना देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. चालणे आणि सायकलिंग स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड शहराला देशातील ११३ शहरांमध्ये पहिल्या ११ शहरांमध्ये स्थान मिळाले आहे ही शहरासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पिंपरी चिंचवड नगरीला क्रीडानगरी म्हणुन नावलौकीक मिळत आहे. मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास मैदानावर हॉकीच्या राष्ट्रीय स्पर्धा महापालिकेच्यावतीने घेण्यात आल्या. या माध्यमातुन सर्व क्रीडा प्रकारात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजनासाठी शहर पुढे पाऊल टाकत आहे. शहरातील खेळाडुंना यातुन प्रोत्साहन मिळुन ते क्रीडा क्षेत्रात शहराच्या नावलौकीकात अधिक भर पाडतील असा विश्वास महापौर माई ढोरे यांनी यावेळी व्यक्त केला.

रुग्णसेवेसाठी वायसीएम, भोसरी, आकुर्डी, थेरगाव, जिजामाता रुग्णालयासह महापालिकेच्या रुग्णालयात अद्यावत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होते. अशा परिस्थितीत जम्बो कोविड रुग्णालये देखील रुग्णसेवेसाठी सज्ज ठेवले आहे, असे महापौर ढोरे यांनी सांगितले. या शहरातील आध्यात्मिक वारसा जतन करण्यासाठी संतपीठ सुरु केले आहे. ही नगरी प्रशस्त आणि नियोजनबध्द रस्त्यांची नगरी म्हणून ओळखली जाते. नाशिक फाटा, भक्ती- शक्ती चौक, वाकड, पिंपरी, चिंचवड, सांगवी अशा विविध ठिकाणी उड्डाणपूल उभारुन दळण वळण व्यवस्था सुरळीतपणे करण्यात आली आहे. शिवाय शहरात विविध ठिकाणी ग्रेडसेपरेटर तयार करुन सिग्नल फ्री रस्ते तयार करण्यात आले आहेत, असे देखील महापौर माई ढोरे म्हणाल्या.

शहरात लवकरच मेट्रो सुरु होणार आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुक गतिमान होईल. शहरातील इतर भागांमध्ये देखीलमेट्रोचे जाळे पसरवण्यासाठी कटीबध्द असल्याचे महापौर ढोरे म्हणाल्या.

या शहरात शिक्षण, व्यवसाय, उदयोग, नोकरीकरीता आलेल्या नागरिकांचे वास्तव्य मोठया प्रमाणात आहे. आरोग्य, दैनंदिन गरजा, जीवनमान या दृष्टीने राहण्यासाठी सर्वोत्तम शहर म्हणून आपले शहर नावारुपाला येत आहे. समाज विकासाशिवाय शहर विकासाला अर्थ नसतो. भारतीय संविधानाच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाच्या तत्वावर आधारीत समाज आणि राष्ट्र निर्मितीसाठी सर्व कटीबध्द होवून या देशाला अधिक बलशाली आणि मजबूत लोकशाही राष्ट्र बनविण्यासाठी आपण संकल्प करुया. तुमचे सहकार्य आणि योगदान या शहरासाठी महत्वाचे ठरणार असुन आपण शहर विकासासाठी सर्व एकजुटीने सहभागी व्हावे अशी अपेक्षा महापौर ढोरे यांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button