ताज्या घडामोडीमुंबई

मुंबईकरांच्या सुरुवात रविवारी आनंदी आणि तणावमुक्त! आयुक्तांच्या संडे स्ट्रीट संकल्पनेला प्रतिसाद

 प्रतिनिधी, मुंबई

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवात रविवारी आनंदी आणि तणावमुक्त झाली. याचे कारण होते त्यांच्यासाठी पोलिसांनी मोकळे करून दिलेले रस्ते. या मोकळ्या रस्त्यांवर मोकळा श्वास घेतानाच मुंबईकरांनी योगासने, कराटे, गायन, तलवारबाजी यांसह अनेक मार्गांनी चार तास अगदी मनमुराद आनंद लुटला. पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या ‘संडे स्ट्रीट’ संकल्पनेला मुंबईकरांनी पहिल्याच रविवारी चांगला प्रतिसाद दिला.

मुंबईच्या धावपळीच्या आणि दगदगीच्या जीवनात मुंबईकरांना उसंत मिळत नाही. वेळात वेळ काढला तरी मुंबईत मोकळी जागा मिळणे फारच कठीण असते. त्यामुळेच मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी ‘संडे स्ट्रीट’ ही योजना आणली. यासाठी मुंबईतील मरिन ड्राइव्ह, वांद्रे, गोरेगाव, डी. एन. नगर, मुलुंड, विक्रोळी येथील सहा प्रमुख रस्ते सकाळी ६ ते १० या वेळेत मोकळे ठेवण्यात आले. या रस्त्यांवरील वाहतूक चार तासांसाठी पूर्णपणे बंद ठेवून हे रस्ते मुंबईकरांना व्यायाम, मनोरंजन, फिरण्यासाठी देण्यात आले. पहिल्याच रविवारी ‘संडे स्ट्रीट’ला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण यामध्ये सहभागी झाले होते.

संजय पांडे यांनी नरिमन पॉइंट येथे सहभागी होत मुंबईकरांचा उत्साह वाढविला. अनेकांनी धावण्याचा, सायकल चालविण्याचा आनंद लुटला. कुणी मनमुराद गाणी गायिली. त्या जोडीला योगासने, कराटे प्रशिक्षण, स्वरक्षणासाठी तलवारबाजीचे प्रात्यक्षिक असे ज्याला जे आवडेल ते सर्वजण मनमुराद करताना दिसले. पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी ‘संडे स्ट्रीट’मध्ये सहभाग घेतला. प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या या संकल्पनेला असाच प्रतिसाद मिळाला तर ती कायम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button